अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना महापालिकेकडून दूषित पाणीपुरवठा — नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर खेळ

  


महाराष्ट्र जनभूमी न्यूज पोर्टल विशेष लेख

वार्ताहर : शिवानंद चौगुले

पिंपरी चिंचवड: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुवर्ण जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सन १९९२ मध्ये पेठ क्रमांक १८, महात्मा फुले नगर परिसरात अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सुमारे एक हजार घरांची निर्मिती केली होती. केवळ ६० हजार रुपयांत २६० स्क्वेअर फूट आकाराची घरे उपलब्ध करून देत सर्वसामान्य कुटुंबांना घराचे स्वप्न दाखवण्यात आले. त्या काळात अनेक कष्टकरी, कामगार, निम्न मध्यमवर्गीय नागरिकांनी मोठ्या आशेने ही घरे घेतली. मात्र ज्या घरांनी सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन द्यायला हवे होते, त्याच ठिकाणी गेली तीन दशके नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे बांधकाम, अपुरी नागरी सुविधा, रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा अशा अनेक समस्यांनी नागरिकांना वेढले. या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी आणि नागरिकांचे हक्क मिळवण्यासाठी महात्मा फुले नगर विकास समितीची स्थापना झाली. नागरिकांनी अनेक वर्षे शासन आणि प्रशासनाच्या विविध कार्यालयांशी संघर्ष करत काही प्रश्न मार्गी लावले; परंतु आजही येथील सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे दूषित पाणीपुरवठ्याचा आहे.

प्रत्येक इमारतीला जीआय पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र आज सुमारे ३० वर्षांनंतर हे पाईप पूर्णतः सडलेले, गंजलेले आणि फुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून जात आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे या गंजलेल्या आणि फुटलेल्या पाईपमधून माती, गाळ आणि दूषित घटक थेट नागरिकांच्या घरातील नळांपर्यंत पोहोचत आहेत. परिणामी नागरिकांना अस्वच्छ आणि आरोग्यास धोकादायक पाणी प्यावे लागत आहे.

परिसरातील अनेक नागरिकांमध्ये पोटाचे विकार, त्वचारोग, ताप, संसर्गजन्य आजार यांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. गरीब आणि कष्टकरी कुटुंबांकडे मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी आर्थिक क्षमता नसताना प्रशासन मात्र या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी प्रशासकीय काळात जनसंवाद सभांमध्ये हा विषय वारंवार मांडला. प्रत्येक इमारतीची जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईप टाकावेत, गळती थांबवावी आणि नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून केवळ “सध्या बजेट नाही”, “प्रस्ताव प्रक्रियेत आहे”, “लवकरच पाहणी करू” अशा नेहमीच्या उत्तरांनी नागरिकांची बोळवण करण्यात आली.


प्रश्न असा निर्माण होतो की, नागरिकांनी प्रत्येक वेळी आपल्या मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्षच करायचा का? करदात्या नागरिकांना स्वच्छ पाणी देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी नाही का? पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या जाहिराती करत असताना दुसरीकडे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असेल तर हा विकास नेमका कोणासाठी आहे?

आज शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जात आहेत. अनेक ठिकाणी सौंदर्यीकरण, भव्य प्रकल्प, सिमेंट रस्ते, स्मार्ट सिटीच्या घोषणा दिल्या जात आहेत; मात्र जिथे गरीब नागरिक राहतात तिथे मूलभूत सुविधा देखील व्यवस्थित दिल्या जात नाहीत. हा केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून गरीब नागरिकांच्या जीवनाशी आणि आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे.

विशेष म्हणजे परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. निवडणुकांच्या काळात नागरिकांच्या दारात जाऊन मते मागणारे लोकप्रतिनिधी अशा गंभीर प्रश्नांवर मात्र शांत का राहतात? नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना प्रशासनावर दबाव निर्माण करून तातडीने पाईपलाईन बदलण्याचे काम का सुरू केले जात नाही? हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

महात्मा फुले यांनी आयुष्यभर शोषित, वंचित आणि सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष केला. त्यांच्याच नावाने उभारलेल्या परिसरात आज गरीब नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासनाची अपयशाची कथा नसून सामाजिक संवेदनशीलतेच्या मृत्यूची निशाणी आहे.

आता तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रश्नाची तात्काळ दखल घेत संपूर्ण परिसरातील जुन्या पाईपलाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अन्यथा नागरिकांचा असंतोष अधिक तीव्र होऊन मोठे जनआंदोलन उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.

थोडे नवीन जरा जुने