तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकार पद्मश्री पुरस्कार कडून प्रदान

 


अहिल्यानगर जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि लोककलेच्या वैभवाचा अभिमान असलेले ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारकडून प्रदान करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. गावगाड्यातील साध्या सोंगाड्यापासून देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या “पद्मश्री” पर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, जिद्द, कलेप्रती निष्ठा आणि लोकसंस्कृतीवरील अपार प्रेम यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

रघुवीर खेडकर यांनी लहानपणापासूनच तमाशा आणि लोककलेशी नाळ जोडली. ग्रामीण भागातील जत्रा, यात्रा आणि लोकनाट्यांच्या फडातून त्यांनी आपल्या कलेचा प्रवास सुरू केला. सुरुवातीला सोंगाड्या म्हणून प्रेक्षकांना हसवत असताना त्यांनी समाजातील वास्तव, ग्रामीण जीवनातील प्रश्न आणि संस्कृतीचे जतन यांचा संदेश आपल्या अभिनयातून दिला. त्यांच्या संवादफेकीची शैली, विनोदबुद्धी आणि लोकांशी थेट जोडणारा अभिनय यामुळे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले.

तमाशा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असली तरी काळाच्या ओघात तिच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली. अशा परिस्थितीत रघुवीर खेडकर यांनी तमाशा कलेला नवसंजीवनी देण्याचे काम केले. त्यांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर ग्रामीण संस्कृती आणि लोकपरंपरा जपण्याचे मोठे कार्य केले. त्यामुळेच त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण लोककलेचा सन्मान मानला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही बाब विशेष अभिमानाची आहे. या आधीही जिल्ह्याने अनेक मानकरी देशाला दिले आहेत. समाजसेवा, कला, साहित्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींना राष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. आता रघुवीर खेडकर यांच्या रूपाने लोककलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावला गेला आहे.

“गाव गाड्यातील सोंगाड्या ते पद्मश्री” हा त्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, सातत्य आणि कलेवरील प्रेम यांच्या जोरावर सर्वोच्च यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. अहिल्यानगरच्या मातीतील हा हिरा आज संपूर्ण देशाच्या गौरवाचा विषय बनला आहे.

किशोर थोरात 

थोडे नवीन जरा जुने