‘सांस्कृतिक क्रांती’ची संकल्पना वास्तवापासून दूर; मार्क्सवादाबाबत प्रा. देशपांडे यांचे स्पष्ट मत


पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) – जागतिक पातळीवर घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा अभ्यास केला, तर मार्क्सवादाने ‘सांस्कृतिक क्रांती’ घडवून आणली, ही धारणा वास्तवाशी सुसंगत नसून ती केवळ एक भ्रांती आहे, असे ठाम मत प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ च्या अंतिम सत्रात ते बोलत होते. तीन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेची सांगता यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर भाष्य करताना प्रा. देशपांडे यांनी मार्क्सवादाच्या मूळ तत्त्वज्ञानाचा आणि त्याच्या ऐतिहासिक संदर्भांचा सखोल वेध घेतला. “कार्ल मार्क्स यांनी मांडलेली क्रांती ही मूलत: आर्थिक विषमता आणि वर्गसंघर्षावर आधारित आहे. त्यामुळे संस्कृतीच्या क्षेत्रात स्वतंत्र क्रांती घडवून आणण्याची क्षमता या विचारसरणीत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. ‘सांस्कृतिक क्रांती’ ही संकल्पना अनेकदा चुकीच्या पद्धतीने मांडली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

युरोपातील एकेश्वरवादी परंपरा, दीर्घकालीन धार्मिक संघर्ष आणि ‘झेनोफोबिया’सारख्या मानसिकतेमुळे तेथील समाजरचनेत सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाले, असे विश्लेषण करत त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेची वैशिष्ट्ये अधोरेखित केली. “भारतीय संस्कृती ही वैविध्यपूर्ण, सहिष्णू आणि समन्वयवादी आहे. त्यामुळे एकरेषीय व केंद्रीत विचारसरणीला येथे कधीच पूर्ण वाव मिळालेला नाही. म्हणूनच भारतात मार्क्सवाद खोलवर रुजला नाही,” असे ते म्हणाले.

तसेच, परकीय प्रभावातून मार्क्सवादी विचारसरणी विविध सामाजिक घटकांना जोडण्याचा प्रयत्न करत असली, तरी समाजाने विवेकबुद्धी जागृत ठेवून अशा विचारांचे चिकित्सक मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “समाज सजग राहिला, तर कोणतीही दिशाभूल करणारी विचारसरणी दीर्घकाळ टिकू शकत नाही,” असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उद्योजक किरण गारवे, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सतीश सगदेव व चंद्रशेखर जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. समृद्धी पैठणकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर श्रीराम काळे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी कु. कायरा श्रीराम पोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन सादर करण्यात आले. देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ ची यशस्वी सांगता झाली.

थोडे नवीन जरा जुने