भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव संपूर्ण देश अभिमानाने करतो. मात्र या संघर्षमय प्रवासामागे निःशब्दपणे उभ्या असलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाकडे समाजाने अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दारिद्र्य, हालअपेष्टा आणि वैयक्तिक दुःख सहन करत त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण व सामाजिक कार्यासाठी अखंड पाठबळ दिले. म्हणूनच रमाई या केवळ एका व्यक्तीचे नाव नसून त्या संघर्ष, संयम आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा डोलारा सांभाळत रमाई यांनी बाबासाहेबांच्या स्वप्नांना बळ दिले. स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून त्यांनी कुटुंब आणि समाजहितासाठी त्यागाचे जीवन जगले. बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना संसाराची जबाबदारी सांभाळणे हे मोठे आव्हान होते; परंतु रमाई यांनी ते शांतपणे निभावले. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष हा भारतीय स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा प्रेरणादायी आदर्श आहे.
आजच्या आधुनिक समाजात माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातून समता, कष्ट, त्याग आणि परस्पर आधार यांचे मूल्य शिकण्याची आवश्यकता आहे. स्त्रीच्या योगदानाचा सन्मान आणि सामाजिक न्यायाची जपणूक करण्यासाठी रमाईंचे जीवन दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना समाजाने समतेच्या विचारांना अधिक बळ देण्याचा संकल्प करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
शिवानंद चौगुले
महाराष्ट्र जनभूमी न्यूज पोर्टल
