वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षिततेसाठीच तसेच रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी वाहतूक जाम होणार नाही,अपघात होणार नाही, ॲम्बुलन्स कुठेही अडचणीत सापडणार नाही यासाठी ही यंत्रणा राबवण्यात येते. रस्ता सुरक्षितता आपल्या हातात आहे. फक्त नियम पाळा मला सिग्नल मिळाल्याशिवाय मी तिथून जाणार नाही रहदारीत कुठेही कोणत्याही कारणास्तव वाहतूक थांबली असेल तर मी लाईनीचे नियम तोडणार नाही.
उगाच इकडून तिकडून गाडीआडवी तिडवी घालणार नाही. बघा फक्त करून बघा. अनुभवून बघा आपला प्रवास सुखाचा होईल .आपण वेळेवर आपल्या इच्छित स्थळी पोहोचू. दगदग होणार नाही. अपघात होणार नाही. मग हे सर्व आपल्यासाठी असताना, आपण नियम तरी का तोडतो...? आणि हो हे करत असताना काहींच्या गाड्या साधारण असतात परंतु ते नियम पाळतात काहींच्या गाड्या अतिशय उच्च किमतीच्या आणि ऐश्वर्याचा डामडोल दाखवणारे असतात. पण याला ऐश्वर्य म्हणावे की काय..? मला काही कळत नाही.
गाडी सिग्नल वर थांबली की तो ड्रायव्हर किंवा पाठीमागे बसलेला काच वर करणार आणि तोंडातील असलेली घाण बाहेर काढणार/टाकणार मग याला आपण खरं ऐश्वर्य म्हणावं का...? अरे ऐश्वर्य हे सर्वतोपरी शोभिवंत असावं. किमती गाडीतून जाताना आपली किंमत कमी होणार नाही याचीही जबाबदारी आपणच घेतली पाहिजे ना...? देश आपला आहे आपल्या देशातील वाहतूक व्यवस्था किती सुरक्षित आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रत्येकाचे आहे...? फक्त वाहतुकीचे नियम पाळून. याला फार मोठी काही कष्ट करावे लागतात किंवा पैसा खर्च करावा लागतो किंवा आपल्याला कष्ट मेहनत करावी लागते असे काहीच नाही. फक्त नियम आणि नियम पाळणे.
आपण सर्वांनी जर नियम पाळले तर या वाहतुकीचा होणारा गुंता आपोआप सुटेल, असे नाही का वाटत आपल्याला..?
मी तर काही विदेशात गेलो नाही परंतु विदेशात म्हणे भारतीय माणसाची ओळख ताबडतोब होते त्याच्या गाडी चालवण्यावरून त्याच्या वागण्यावरून. याचा अर्थ काय समजायचं..? आपण स्वातंत्र्यात आहोत पारतंत्र्यात नाही पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय..? स्वातंत्र्यात आपली जबाबदारी काय? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर असलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडून आनंदी जीवन जगणे आणि दुसऱ्याच्या आनंदात भर पाडणे. यासाठी कुण्या मार्गदर्शकाची गरज आहे का...? मला तर वाटत नाही. बघा आज या पोलीस यंत्रणावरचा जो ताण आहे तो ताण जास्त लोकसंख्या असलेला देश आहे म्हणून नव्हे तर नागरिकांचे बेशिस्त वागण्यामुळे, प्रत्येक ठिकाणी या पोलीस दलावर ताण निर्माण होतो त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे..?
स्वच्छता सुरक्षितता आणि सातत्यता हे तीन गुण प्रत्येक माणसाजवळ असणे अतिशय गरजेचे आहे. हे गुण ज्याच्या अंगी आहे तो नक्की ज्या देशावर प्रेम करतो असे समजावे.. ज्यांच्या अंगी हे गुण आहेत ते निश्चित या देशाचे गुणवान नागरिक आहेत.
यशवंत कण्हेरे
अध्यक्ष कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच
महात्मा फूले नगर चिंचवड पुणे १९
