काराकास : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या दुहेरी भूकंपानंतर मृतांचा आकडा 920 वर पोहोचला असून, 50 हजारांहून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत 920 जणांचा मृत्यू झाला असून 3,360 जण जखमी झाले आहेत. तर 172 नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. शुक्रवारी दुपारी 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक धक्का बसला असून तो राजधानी काराकास आणि आसपासच्या भागात जाणवला.
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, या भूकंपामुळे सुमारे 6.7 अब्ज अमेरिकी डॉलरचे थेट आर्थिक नुकसान झाले आहे. हा भूकंप गेल्या शंभर वर्षांतील व्हेनेझुएलातील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगितले जात आहे.
बचावकार्य सुरू, यंत्रसामग्रीचा तुटवडा
सर्वाधिक फटका बसलेल्या ला ग्वायरा परिसरात स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवक स्वतःच्या प्रयत्नांनी ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढत आहेत. मात्र, जड यंत्रसामग्री आणि सरकारी मदतीचा अभाव असल्याने बचावकार्य संथ गतीने सुरू आहे.
25 वर्षीय जेनिफर पालासिओस यांनी सांगितले की, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आणि आणखी पाच नातेवाईक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. "लोकांना जिवंत बाहेर काढण्याचे काम स्थानिक नागरिक करत आहेत. मोठे काँक्रीटचे तुकडे हटवण्यासाठी क्रेनची तातडीने गरज आहे," असे त्यांनी सांगितले.
परदेशी मदत पोहोचू लागली
मेक्सिको, एल साल्वाडोरसह अनेक देशांची बचाव पथके व्हेनेझुएलामध्ये दाखल झाली आहेत. आधुनिक ड्रोन, उष्णता शोधणारी उपकरणे आणि प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.
एल साल्वाडोरच्या बचाव पथकाने एका 15 वर्षीय मुलीचा आणि तिच्या पाळीव प्राण्याचा शोध लावला असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अमेरिकेची मदत
अमेरिकेने 150 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या मदतीची घोषणा केली असून दोन जहाजे, हेलिकॉप्टर आणि विमाने बचावकार्यासाठी पाठवली आहेत. तसेच काही निर्बंधही तात्पुरते शिथिल करण्यात आले आहेत.
मोठ्या प्रमाणात जीवितहानीची शक्यता
अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने (USGS) या आपत्तीत मृतांचा आकडा 10 हजारांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेनुसार, सुमारे 70 लाख नागरिक या भूकंपामुळे प्रभावित होऊ शकतात.
दरम्यान, व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन या भूकंपामुळे प्रभावित झाले नसल्याची माहिती तेथील तेलमंत्र्यांनी दिली आहे. इंधन पुरवठा सुरळीत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
