!-- afp header code starts here --> फिरते ग्रंथालय वाहन हस्तांतरण सोहळा उत्साहात

फिरते ग्रंथालय वाहन हस्तांतरण सोहळा उत्साहात


वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम; ज्ञान प्रत्येकाच्या दारी पोहोचविण्याचा संकल्प

पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी-पुणे संचलित रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "फिरते ग्रंथालय (Books On Wheels)" वाहन हस्तांतरण सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ज्ञानाची गंगा प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिमेस पुष्पार्पण आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर फिरत्या ग्रंथालयाच्या वाहनाचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी या ज्ञानयज्ञाला शुभेच्छा दिल्या. रोटरी क्लबचे पदाधिकारी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्यकर्ते, ग्रंथप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रशांत पेडणेकर यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वास करंदीकर यांनी ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत फिरत्या ग्रंथालयाच्या संकल्पनेमुळे ग्रामीण भाग, वाचनालयांपासून दूर असलेल्या वस्त्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे सांगितले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष केशव मनगे यांनी रोटरी संस्थेच्या जागतिक कार्याची माहिती देताना, "रोटरी ही जगभरात समाजसेवेचे कार्य करणारी संस्था असून समाजाने दिलेले काहीतरी समाजालाच परत देण्याची भावना रोटरी जोपासत आहे," असे सांगितले.

दस्तऐवज हस्तांतरणानंतर मनोगत व्यक्त करताना उद्योजक तथा रोटरियन अरविंद खंडकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. "माझ्या वाचनाची आवड माझ्या आजीमुळे निर्माण झाली. पुस्तकांमुळे विचार समृद्ध होतात, व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण होते. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे," असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मनोगताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी गीताताई खंडकर, अरविंद खंडकर तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. वाहन हस्तांतरणाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून फिरत्या ग्रंथालयाच्या नव्या प्रवासाला प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया होनप यांनी केले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमामुळे पुस्तके थेट वाचकांच्या दारी पोहोचणार असून "घराघरांत पुस्तक आणि प्रत्येक मनात विचार" हा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि ज्ञानसंस्कृती बळकट करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

वार्ताहर : शिवानंद चौगुले, महाराष्ट्र जनभूमी न्यूज

थोडे नवीन जरा जुने