पुणे : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विस्तारित अंदाजानुसार, गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला नैऋत्य मान्सून १ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२५ जून ते १ जुलै या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, दक्षिण भारतातील काही भाग आणि ईशान्य भारतात सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर २ ते ८ जुलैदरम्यान देशभरात सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात आतापर्यंत पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. २४ जूनअखेरच्या आठवड्यात देशात सरासरीपेक्षा ४७ टक्के कमी पाऊस झाला असून, १ जूनपासूनची एकूण तूट ४२ टक्के आहे. मध्य भारतात ही तूट सर्वाधिक ५९ टक्के इतकी आहे.
आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुश्मा नायर यांनी सांगितले की, २८-२९ जूनपर्यंत मान्सूनचा प्रवाह कमकुवत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामानातील अनुकूल परिस्थितीमुळे मान्सून पुन्हा जोर धरेल आणि पावसाची तीव्रता वाढेल.
त्यांच्या मते, मान्सूनचा पुनरुज्जीवनाचा तसेच पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
