माळेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त



बारामती (वर्षा चव्हाण) : माळेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत दोन ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत एकूण 550 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पहिली कारवाई घाडगेवाडी येथे करण्यात आली. येथे पांडुरंग बाबल्या भोसले यांच्या शेतामध्ये अज्ञात व्यक्ती गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून हातभट्टीसाठी लागणारे साहित्य व बॅरलमधील रसायन जप्त करण्यात आले. यावेळी सुमारे 400 लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले तसेच जेसीबीच्या सहाय्याने हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली.

त्यानंतर मौजे निरावागज, ता. बारामती येथे करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत वैभव भोसले याची हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. या ठिकाणी 150 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी माळेगाव पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी दिली.

"अवैध धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही सुरू राहणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे," असेही त्यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने