बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून ५.४२ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

 


प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर अॅड. राजेश राजपुरोहित यांचा प्रभावी युक्तिवाद; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या बहुचर्चित कारवाईत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे ५.४२९ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून आरोपीच्या वतीने अॅड. राजेश राजपुरोहित यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी बँकॉकहून पुण्यात आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली होती. तपासादरम्यान खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवण्यात आलेले संशयास्पद पॅकेट्स आढळून आले. त्यामधून सुमारे ५.४२९ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला होता. या अमली पदार्थाची काळ्या बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ४२ लाख रुपये असल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला होता. त्यानंतर सीमाशुल्क विभागाने आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

दरम्यान, आरोपीच्या वतीने अॅड. राजेश राजपुरोहित यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून सविस्तर युक्तिवाद केला. जप्त करण्यात आलेले कथित अमली पदार्थाचे प्रमाण हे एनडीपीएस कायद्यानुसार व्यावसायिक प्रमाणापेक्षा (Commercial Quantity) कमी असल्याने कलम ३७ अंतर्गत लागू होणारे कठोर निर्बंध सदर प्रकरणात लागू होत नसल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला. तसेच तपास यंत्रणेकडून संपूर्ण तपास पूर्ण करण्यात आला असून न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले आहे. त्यामुळे आरोपीचा पुढील कोठडीतील ताबा आवश्यक नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

याशिवाय आरोपी हा तपासात सहकार्य करणारा असून त्याच्याविरुद्ध कोणतेही गंभीर गुन्हेगारी पूर्वइतिहास सिद्ध करण्यात आलेला नाही, तसेच तो न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करण्यास तयार असल्याचेही अॅड. राजपुरोहित यांनी नमूद केले.

सरकारी पक्षाने गुन्ह्याचे गांभीर्य, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे स्वरूप आणि समाजावर होणारा परिणाम यांचा उल्लेख करून जामीनास विरोध दर्शविला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, तपासाची स्थिती, जप्तीचे प्रमाण तसेच न्यायालयासमोर उपलब्ध असलेली कागदपत्रे यांचा विचार करून मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीस जामीन मंजूर केला.

एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल झालेल्या आणि मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या प्रकरणात आरोपीस जामीन मिळाल्याने कायदेवर्तुळात या आदेशाची चर्चा सुरू झाली असून आरोपीच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडल्याबद्दल अॅड. राजेश राजपुरोहित यांचे कौतुक होत आहे.

सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. प्रीती धुळे, अॅड. अविनाश गायवाड, महेश मारकड यांनी कामकाज पाहिले.

थोडे नवीन जरा जुने