पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक ११ मधील भीमशक्ती नगर येथे मुसळधार पावसामुळे सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज) व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने रेल्वे परिसरातील पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले असून लहान मुलांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीत एका चिमुकलीने प्रशासनाला भावनिक प्रश्न विचारला – "घरात पाणी येत असेल तर आम्ही झोपायचं कसं, राहायचं कसं?" हा प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जीपणावर थेट बोट ठेवणारा आहे.
या घटनेची माहिती मिळताच मारुती गणपत जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, सुमारे एक महिन्यापूर्वी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून संपूर्ण ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच आत साचलेला गाळ आणि माती काढण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने केवळ वरवरची साफसफाई करून मूळ समस्या कायम ठेवली. परिणामी पावसाचे पाणी घरांमध्ये घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने संपूर्ण ड्रेनेज लाईनची यंत्रणेद्वारे सखोल साफसफाई करून त्यामधील गाळ व अडथळे हटवावेत आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
मारुती जाधव पाऊसात जाऊन भिम शक्ती नगर मधील पाहणी करून ड्रेनेज लाईन मधील माती व गाळ काढण्यासाठी अधिकाऱ्यांना भाग पाडले व नागरिकांची सोय करून दिली.



