जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कुकडी नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नदीच्या तीरावर आणि पुलालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने संपूर्ण परिसर कचराकुंडीचे स्वरूप धारण करत असून, पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
जुन्नर - गोळेगाव मार्गावरील नदीकिनारी प्लास्टिक, घरगुती ओला-सुका कचरा, काचांच्या बाटल्या, पॅकेजिंग साहित्य आणि विविध टाकाऊ वस्तूंचे ढिग साचले आहेत. हा कचरा थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पाण्याची गुणवत्ता खालावत असून नदीतील जैवविविधतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कुकडी नदीचे पाणी परिसरातील अनेक गावांमध्ये शेती, जनावरे आणि इतर दैनंदिन गरजांसाठी वापरले जाते. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे हेच पाणी आता आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात हा कचरा अधिक वेगाने नदीत वाहून जाण्याची शक्यता असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
रस्त्यालगत पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून परिसराचे सौंदर्यही नष्ट होत आहे. यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुकडी नदीचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
.png)