!-- afp header code starts here --> सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने चिखली पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांचे स्वागत व महिला पोलीस उपनिरीक्षक दिपमाला लोहोकरे यांचा सन्मान

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने चिखली पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांचे स्वागत व महिला पोलीस उपनिरीक्षक दिपमाला लोहोकरे यांचा सन्मान

 


पिंपरी-चिंचवड : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने आज चिखली पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित जाधव यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपमाला लोहोकरे यांची नुकतीच झालेली बढती झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री अमोल फडतरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमित कोकणे, संस्थेच्या सदस्य शारदा नारोन्हा, आफ्रिन सय्यद, सारिका यादव, योगेश यादव आणि राजेंद्र चकटे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात यांनी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाची स्थापना, उद्दिष्टे तसेच मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवक प्रबोधन आणि जनजागृतीसाठी राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यानंतर डॉ. अमित कोकणे यांनी चिखली पोलीस स्टेशनच्या सहकार्याने संघाने यापूर्वी यशस्वीरीत्या राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अध्यात्मिक मार्गदर्शन कार्यक्रम, रक्षाबंधन साजरे करून पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विविध प्रसंगी सन्मान अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या समन्वयातून समाजहिताची प्रभावी कामे सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित जाधव यांनी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. समाजोपयोगी आणि जनजागृतीपर उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबवावेत, तसेच चिखली पोलीस स्टेशनकडून संस्थेला आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

सदर उपक्रम सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेशजी कुंभारे यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला. त्यांनी पुणे जिल्हा टीमचे अभिनंदन करून समाजहितासाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडला. पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांमधील परस्पर सहकार्य, विश्वास आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरला.

थोडे नवीन जरा जुने