निगडी प्राधिकरण, चिंचवड
महाराष्ट्र जनभूमी न्यूज – वार्ताहर : शिवानंद चौगुले
जलसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणी जलसंवर्धन व स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव परिसरातील वीर सावरकर उद्यान तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी घाट व मंदिर परिसरात झालेल्या या अभियानात शाळेच्या सुमारे ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी गणेश तलाव परिसर तसेच मोरया गोसावी महाराज मंदिर व घाट परिसराची स्वच्छता केली. केवळ स्वच्छता करून न थांबता विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी बचत, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचा प्रत्येक थेंब जपला पाहिजे, तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना Seed Balls आणि Seed Paper वाटप करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा पर्यावरणपूरक संदेश दिला. वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि स्वच्छता या तिन्ही बाबी एकमेकांशी जोडलेल्या असून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात छोट्या-छोट्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव परिसरातील अभियानास पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर मा. सौ. शर्मिला ताई बाबर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जलसंवर्धन व स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
चिंचवड येथील मोरया गोसावी घाट व मंदिर परिसरातील अभियानात विरोधी पक्षनेते मा. श्री. भाऊसाहेब भोईर तसेच मा. श्री. सुरेश भोईर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी तरुण पिढीने पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्वांनी ‘वसुंधरा संवर्धनाची शपथ’ घेत पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वच्छता अभियानाला पर्यावरण संवर्धनाच्या व्यापक संदेशाची जोड मिळाली.
या अभियानासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच मोरया गोसावी मंदिर ट्रस्टचे मा. मंदार देव महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी मा. साबळे सर, मुकेश जगताप सर आणि संतोष सुर्वे सर तसेच महानगरपालिकेच्या इतर अधिकारी व कर्मचारीवर्गाने अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या वतीने शिक्षक लीना आढाव, अनिता चटर्जी, मनिषा खचराने, स्वप्नील शिंदे आणि रोहित साळवी यांनी अभियानात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पारोमिता नंदी आणि उपमुख्याध्यापिका मेघा शिदोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे परिसर स्वच्छ करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती झाली. ‘स्वच्छता हीच सेवा’, ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ आणि ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ या संदेशांनी संपूर्ण अभियानाला सामाजिक व पर्यावरणीय जाणिवेची दिशा दिली.
विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता नागरिकांनीही आपल्या परिसराच्या स्वच्छतेची आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली, तर पिंपरी-चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनण्यास निश्चितच हातभार लागेल, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
