जुन्नर, दि. १९ (रफिक शेख) : पिंपळवंडी येथे निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या अमानुष घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत एका निष्पाप बालिकेवर अत्याचार होऊन तिची हत्या होणे ही अत्यंत वेदनादायी आणि समाजमन हेलावून टाकणारी घटना आहे. बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तींना समाजात कोणत्याही परिस्थितीत थारा मिळता कामा नये, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, केवळ अटक करून न थांबता या प्रकरणाचा तपास जलदगतीने आणि निष्पक्षपणे पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात भक्कम पुरावे सादर करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळेल, यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे पाठपुरावा करावा, अशीही मागणी होत आहे.
या अमानुष घटनेमुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या दुःखात संपूर्ण समाजाने सहभागी होण्याची गरज आहे. चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
