बिजलीनगर येथील महत्त्वाच्या ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
महावितरणच्या बिजलीनगर येथील महत्त्वाच्या ट्रान्सफॉर्मरला आज सकाळी सुमारे १० वाजता आग लागली. या आगीमध्ये ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यानंतरचा विद्युत पुरवठा खंडित झाला.
या घटनेमुळे संपूर्ण चिंचवडगाव, पिंपरी परिसरातील काही भाग, गावडे नगर, रावेत परिसरातील बहुतांश भाग, काळेवाडीतील बहुतेक भाग, चिंचवडे नगर, वाल्हेकरवाडी आदी अनेक भागांतील नागरिकांना तब्बल १२ तास विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागला.
या घटनेमागील नेमके कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, या अपघातासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर काही महत्त्वाचे प्रश्न व शंका उपस्थित केल्या आहेत.
या घटनेला नेमके जबाबदार कोण? संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी? देखभाल-दुरुस्तीतील त्रुटी? की अन्य काही कारण? याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
विद्युत पुरवठा तब्बल १२ तास बंद राहिल्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक रुग्णालयांमधील रुग्णांना याचा त्रास झाला. घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार कोण, याचे उत्तर संबंधित यंत्रणांनी जनतेला देणे आवश्यक आहे.
या प्रकरणात महावितरणकडून महापारेषणच्या चुकीकडे बोट दाखवले जात आहे, तर महापारेषणकडून अद्याप ही चूक मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघाताचे मूळ कारण काय आणि त्यासाठी जबाबदार कोण, याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
ही अत्यंत गंभीर बाब असून, या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
सदर घटना केवळ नैसर्गिक किंवा आकस्मिक अपघात म्हणून दुर्लक्षित करून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न होता कामा नये. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीही जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने चौकशी व योग्य ती कारवाई न झाल्यास, या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवून संबंधित यंत्रणेकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल.
सदर घटनेची वस्तुस्थिती आणि चौकशीचा अहवाल जनतेसमोर स्पष्टपणे मांडण्यात यावा, अशी मागणी आहे. जनतेला झालेल्या त्रासाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.
मधुकर बच्चे
सदस्य, महावितरण समिती
मो. ७३८५५४६६८१
