आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री जलाराम बाप्पा जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने श्री जलाराम बाप्पा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने आळंदीकरांचे लक्ष वेधून घेतले.
सकाळी आकर्षक पुष्पसजावट केलेल्या वाहनावर श्री जलाराम बाप्पांची प्रतिमा विराजमान करून शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बँडच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
आळंदीतील नागरिकांनी शहरात ठिकठिकाणी या शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी श्री जलाराम सत्संग ट्रस्टचे मान्यवर पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भव्य मंडप उभारून आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात विधिवत पूजा, महाआरती आणि भजनाचे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे (अन्नदान) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला.
