MGID Header Code
Code End

रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत नियमित बससेवा सुरू करा - नाना काटे यांची मागणी


व्यस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) यांना निवेदन 

पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव हा परिसर झपाट्याने विकसित होत असून या भागातील लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, हिंजवडी आयटी पार्क येथे नोकरी व कामानिमित्त ये-जा करतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास हा एक महत्त्वाचा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी नियमित व थेट सार्वजनिक बससेवेचा अभाव असल्याने नागरिकांना खासगी वाहने, दुचाकी किंवा इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे.

परिणामी, दररोज सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढत असून नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित, नियमित आणि वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. असे नाना काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर रहाटणी – पिंपळे सौदागर – पिंपळे गुरव या परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत थेट व नियमित PMPML बससेवा सुरू करणे ही काळाची गरज बनली आहे.

सदर बससेवा सुरू झाल्यास नागरिकांना मेट्रोपर्यंत सहज पोहोचता येईल, खासगी वाहनांचा वापर कमी होईल, पर्यायाने रस्त्यांवरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल.

त्यामुळे आपण या विषयाकडे केवळ एका बसमार्गाची मागणी म्हणून न पाहता, वाढत्या शहरी लोकसंख्येची आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेची गंभीर बाब म्हणून पाहावे.

तरी आपण संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तातडीने या मार्गाची पाहणी व प्रवासी संख्येचे सर्वेक्षण करून रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव येथून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत नियमित बससेवा सुरू करण्याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच कार्यालयीन वेळेतील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा वारंवारतेने बसफेऱ्यांचे नियोजन करावे, ही आग्रही मागणी आहे.

नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, ही अपेक्षा.

श्री. विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे

मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

थोडे नवीन जरा जुने