पुणे - पर्यावरण रक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण व नि:स्वार्थ सेवेसाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे जुन्नर येथील रमेश खरमाळे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून खरमाळे यांनी वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता मोहिमा तसेच जनजागृती अभियान राबवून पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या अखंड सेवाभावाची दखल घेत संघटनेने त्यांना सन्मानपत्र प्रदान केले.
या प्रसंगी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात, पुणे जिल्हा सचिव विजय महाजन, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर, पुणे शहर जनरल सेक्रेटरी रवींद्र आळणे, पिंपरी चिंचवड शहर सचिव विनायक जगताप,पिंपरी चिंचवड शहर सह सचिव मारुती तमवार आदी उपस्थित होते, तर पुढील पंधरा दिवसात वृक्षारोपण कार्यक्रम करणार असल्याची पण चर्चा करण्यात आली.
एक कुटुंब काय करू शकते
वनांचे संरक्षण करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी योगदान दिले गेले नाही तर मानव जातच नाही तर संपूर्ण जैवविविधता संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. आपण पाहतो की या योगदानासाठी विविध संस्था, ग्रुप व्यक्ती पुढे येत असतात. पैकी जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी तर आपले संपूर्ण कुटुंबच पर्यावरण सेवेत कामाला लावलेले पहायला मिळते. १७ वर्षे देश सेवा करुन हा माणूस गप्प बसून न राहता पर्यावरण सेवेचे व्रत अविरतपणे जोपासताना पहायला मिळत आहे.
एक कुटुंब पर्यावरणासाठी काय करु शकते यावर आपला विश्वास बसणार नाही परंतु हे करुन दाखवलं आहे ते या खरमाळे कुटुंबाने. पर्यावरण संरक्षणासाठी वसा घेतलेल्या या कुटुंबाने श्रमदानातून जलशोसक चर खोदून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला गवसणी घातली. लगातार ६० दिवसांत ७० जलशोसक चर खोदून एक आदर्श या कुटुंबाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो पण निस्वार्थीपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, विशेष म्हणजे या कुटुंबाने हे काम स्वतःच्या गावात न करता दुसऱ्या गावांसाठी करून एक वेगळा आदर्श दाखवून दिला आहे. हे कुटुंब एवढंच करून थांबले नाही तर जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक, नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी उपलब्ध रहावा म्हणून त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत व भविष्यात निर्माण होणाऱ्या असंख्य धोक्यापासून सुरक्षितता कशी घेतली जाईल यासाठी आदर्श जगासमोर ठेवला आहे. जगाने पण या कुटुंबाच्या कार्याची दखल घेत आजपर्यंत शेकडो पुरस्कारांनी त्यांना गौरविले असुन त्यांच्या घराच्या भिंती अक्षरशः पुरस्कारांनी सजविलेल्या पहायला मिळतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तर या कुटुंबाच्या कार्याचा गौरव म्हणून या कुटुंबावर एक शॉर्टफिल्म चित्रीत करून जगासमोर मांडली असून प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी पण जगायला शिका असा संदेशच दिला आहे व या शॉर्टफिल्मचे टायटलच "कपल फॉर इन्व्हारमेंटल" असे नाव देत कुटुंबाला प्रोत्साहन दिले आहे.
काय केले या कुटुंबाने?
१) १७ वर्षे भारतीय सैन्यदलात देशरक्षण.
२) वनवा विझविण्यासाठी प्रत्येक वर्षी मदत करणे.
३) वनवा लागू नये म्हणून वैयक्तिक श्रमदानातून प्रत्येक वर्षी जाळरेषा काढणेस मदत करणे.
४) वनवा लागू नये म्हणून वैयक्तिक श्रमदानातून प्रत्येक वर्षी गवत कापणी करणेस मदत करणे.
५) उन्हाळ्यात पक्षी प्राणी यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून श्रमदानातून अनेक पाणवठे निर्माण केले.
६) जुन्नर तालुक्यातील ५२ बारवा प्रकाश झोतात आणल्या व त्यांचे स्वच्छता अभियान राबवून पशूपक्षांची पाय-या उतरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
७) जमीनीत लाखो लिटर पाणी जिरविण्यासाठी श्रमदानातून जलशोशक चर खोदून निर्माण केले व गाडलेले चर प्रत्येक वर्षी पुन्हा उकरून काढणे.
८) विविध ठिकाणी वृक्षारोपण केले.
९) शेकडो शाळा, कॉलेज व इतर ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी व्याख्याने दिली.
१०) जख्मी पशूपक्षांना वाचवण्यासाठी योगदान दिले.
११) लाखो बीज संकलन करून अनेक नर्सरी मध्ये व व्यक्तींना मोफत वाटप केले.
१२) वृक्षतोड थांबविण्यासाठी अनेक गावांमध्ये झाडांचे महत्त्व सांगत जनजागृती केली.
१३) विविध डोंगर द-यांमध्ये लाखो बीजारोपण करुन वृक्ष वाढीस मदत केली.
१४) अनेक ठिकाणी बीज गोळे स्वतः टाकले.
१५) अडकलेल्या पशूपक्षांना वाचवण्यासाठी मदत केली.
१६) लावलेल्या वृक्षांना उन्हाळ्यात श्रमदानातून पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न केला.
१७) जुन्नर तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळे प्लास्टिक मुक्त केले.
१८) ७ दिवसांत किल्ले शिवनेरी वर १५ हजार शालेय विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त किल्ले व परीसर कसा ठेवू शकाल याबाबत मार्गदर्शन केले.
१९) पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागामार्फत शासकीय गाईड तयार करण्यासाठी योगदान दिले.
२०) विविध मिडीयांच्या माध्यमातून सतत पर्यावरण संवर्धन जनजागृती केली.
२१) पशूपक्षांचे महत्त्व अधोरेखित करून शिकार रोखण्यासाठी मार्गदर्शन केले.
२२) प्रदुषण नियंत्रणासाठी ७ डोंगर रांगेवर सायकल चालवून प्रदुषण नियंत्रणासाठी जनजागृती केली.
२३) श्रमदानातून स्वतः वनतळी निर्माण करण्यासाठी योगदान दिले.
२४) मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करून त्या वाचवण्यासाठी मार्गदर्शन केले.
२५) डोंगर द-यांमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवून जीवदान देण्याचे कार्य केले.
२६) गरीबांना उपचारासाठी लाखो रुपये मदतीचे आवाहन करत निधी जमा करून दिला २७) रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला हव्यात म्हणून जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर मांडण्याचा सतत प्रयत्न या कुटुंबाने केला.
२८) जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक वारसा लेखन, विविध मिडियाचा वापर करून जगासमोर आणला.
२९) जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक वारसा तेलगू भाषेतील ११ वीच्या विद्यार्थ्यांच्या युवकभारती या पुस्तकात समाविष्ट करण्यात योगदान दिले व पर्यटन वाढीसाठी चालना दिली.
३०) जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणांचे १२ ऐतिहासिक भुयारी मार्ग प्रकाशझोतात आणले.
३१) जुन्नर तालुक्यातील ४८ नैसर्गिक धबधबे प्रकाशझोतात आणले.
३२) जुन्नर तालुक्यातील १६ ठिकाणची गजलक्ष्मी शिल्पे शोधून प्रकाशझोतात आणली.
३३) जुन्नर तालुक्यात विविध रेस्कूंच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान दिले.
३४) जुन्नर तालुक्यावर लाखो छायाचित्र टिपली.
३५) जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची छायाचित्रे इंडियन डाकघरच्या पोस्ट कार्डवर प्रकाशित करण्यात योगदान दिले.
३६) जुन्नर तालुक्यावर लिहील्या गेलेल्या ऐतिहासिक पुस्तकांतून अनेक लेख प्रसिद्ध करण्यात योगदान दिले.
३७) जुन्नर तालुक्याचा काळ आड गेलेला ऐतिहासिक वारसा संशोधन करून जगासमोर आणला.
३८) किल्ले संवर्धनासाठी श्रमदानातून योगदान दिले व गडकोट वाचविण्यासाठी मार्गदर्शन केले.
३९) जुन्नर तालुक्यातील गोरगरीब गरजूंना लाखो रूपयांची आर्थिक मदत फेसबुकवर केलेल्या आव्हानाद्वारे मिळवून दिली.
४०) जुन्नर तालुक्यातील विविध डोंगर रांगेवर असलेल्या २३ ऐतिहासिक शिवकालीन टाक्या जगासमोर आणल्या.
४१) विविध गावांतील दगडी शिल्पे जगासमोर आणली.
४२) जुन्नर तालुक्यातील पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारे हजारो लेख, व्हिडिओ जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
४३) जुन्नर तालुक्यातील विस्मृतीत गेलेल्या कातळ शिल्पांची ७ ठिकाणे जगासमोर आणली.
आपणही जर ठरविले तर निश्चितच असे योगदान देऊन या जीवनास सार्थकी लावू शकता व आपल्या बहुमोल योगदानातुन पर्यावरण वाचविण्यासाठी मदत करून भावी असंख्य पिढ्यांचे आरोग्य धोक्यात येण्यापासून वाचवू शकता. चला तर आपणही अशा सामाजिक कार्यास हातभार लावू या व हा मानव जन्म सार्थकी करू या.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे खरमाळे यांच्या कार्याचे कौतुक करत असे सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी प्रेरणादायी ठरतात असे मत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी रामेशजी खरमाळे यांना शुभेच्छा दिल्या व पुणे टीम चे कौतुक केले.