१२ ते २० नोव्हेंबरदरम्यान वाहनांना प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था, बस थांबे माहिती -
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिकी यात्रे च्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. आळंदी यात्रा १२ ते २० नोव्हेंबर २०२५ कालावधीत होत आहे. यात १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आणि १७ नोव्हेंबर रोजी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी दिन सोहळा असल्याने महाराष्ट्रासहदेश विदेशातून लाखो भाविक देवदर्शनासाठी येत असतात. या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तसेच आळंदी आणि देहूगाव येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यातील प्राप्त अधिकारानुसार हे आदेश निर्गमित केले आहेत.
जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी -
दिनांक १२ नोव्हेंबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि दिंडीतील वाहने वगळता, सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी काही मार्गांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
मोशी चौक आणि भारतमाता चौक ( मोशी ) येथून आळंदीकडे येणारी जड अवजड वाहने:
या वाहनांनी जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे चोविसावाडी / विश्रांतवाडी /भोसरी मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी. मोशी-चाकण शिक्रापूर मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
चिंबळी फाटा चौक ( चाकण ), आळंदी फाटा चौक ( चाकण ), माजगाव फाटा, भोसे फाटा, आणि चाकण-वडगाव घेणंद मार्गे आळंदीकडे येणारी वाहने:
या वाहनांसाठी देखील जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे चोविसावाडी /विश्रांतवाडी / भोसरी किंवा भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी हे पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. माजगाव आणि भोसे फाट्याकडून येणाऱ्या वाहनांनी कोयाळी कमान, कोयाळी मरकळगाव मार्गे जावे.
मरकळ मार्गे आळंदीकडे येणारी जड अवजड वाहने:
यांनी धानोरी फाटा, चऱ्होली फाटा मार्गे भोसरी-विश्रांतवाडीचा मार्ग अवलंबावा.
पुणे-दिघी मॅगझीन चौक मार्गे आळंदीकडे येणारी वाहने:
यांसाठी भोसरी मार्गे मोशी चाकण, अलंकापुरम जयगणेश साम्राज्य चौक मार्गे-चाकण, किंवा चऱ्होली फाटा धानोरीफाटा मार्गे मरकळ पुणे हे पर्याय आहेत.
याव्यतिरिक्त, देहूगाव कमान ( जुना मुंबई-पुणे हायवे ) येथून देहूगावकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. तसेच कॅनबे चौक येथून देहूगावात जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहतुकीस प्रवेश बंदी आहे. तळेगाव-चाकण रोडवरील देहूफाटा येथून देहूगाव जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या जड अवजड वाहतुकीस प्रवेश बंद असेल.
या मार्गावरील वाहने एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद राहील, त्यांनी परंडवाल चौक, साईराज चौक ते भैरवनाथ चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.
आळंदी शहरात सर्व वाहनांना प्रवेश बंदी-
१२ नोव्हेंबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत ( अत्यावश्यक सेवा आणि दिंडीतील वाहने वगळता ), खालील ठिकाणांवरून आळंदी शहरात जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी रहाणार आहे:
पुणे – आळंदी रस्ता: चऱ्होली फाटा चौक येथे रस्ता बंद असेल.
मोशी – आळंदी रस्ता: डुडूळगाव जकातनाका येथे प्रवेश बंद असेल.
चिंबळी – आळंदी रस्ता: केळगांव चौक / बोपदेव चौक येथे रस्ता बंद करण्यात येईल.
चाकण ( आळंदी फाटा ) – आळंदी रस्ता: इंद्रायणी हॉस्पीटल येथे प्रवेश बंद असेल.
वडगांव घेणंद मार्गे – आळंदी रस्ता: विश्रांतवड येथे रस्ता बंद राहणार आहे.
मरकळ – आळंदी रस्ता: धानोरेफाटा/पीसीएस चौक येथे प्रवेश बंदी राहील.
भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था-
देहू तसेच आळंदीकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे:
देहुगाव, मोशी, हवालदार वस्ती फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी आळंदी देहू रोडवरील तळेकर पाटील चौक ( दक्षिणेस दोन एकर आणि उत्तरेस एक एकर ) तसेच डुडुळगाव जकातनाका जवळ ज्ञानविलास कॉलेज आणि आदित्य इंटरनॅशनल स्कुल येथे पार्किंग असेल.
आळंदी तसेच चिंबळी फाट्याकडून येणाऱ्या वाहनांनी मुंगसे बोपदेव चौक येथे पार्किंग करावी ( साडे चार एकर ).
चाकण आळंदी फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी इंद्रायणी हॉस्पीटल समोर (चाकण रोड) पार्किंगची सोय आहे (९ एकर).
वडगाव घेणंद शेल पिंपळगावकडून येणाऱ्या वाहनांनी विश्रांतवड वडगाव रोडलगत तसेच मुक्ताई मंगल कार्यालय समोर पार्किंग करावी. ( २५ एकर ).वडगाव कडून येणाऱ्या वाहनांसाठी वडगाव चौक आळंदी शौचालयाजवळील नगरपरिषद पार्किंग सोय उपलब्ध आहे.
एस.टी. आणि पीएमपीएमएल बस स्टॅण्डची ठिकाणे-
आळंदी येथून जाणाऱ्या एस.टी./पीएमपीएमएल बससाठी खालील ठिकाणी स्टॅण्ड निश्चित करण्यात आले आहे.
सर्व ठिकाणी जाण्यासाठी एस.टी. बसेसचा स्टॅण्ड योगिराज चौक येथे सोय ठेवली आहे.
देहुगावकडे जाण्यासाठी एस.टी./पीएमपीएमएल बस डुडुळगाव जकातनाका येथे उपलब्ध राहणार आहे.
पुणे बाजुकडे जाणे/येणे करीता एस.टी./पीएमपीएमएल बस चऱ्होली फाटा येथे थांबेल.
वाघोली-शिक्रापूरकडे जाणे/येणे करीता एस.टी./पीएमपीएमएल बस धानोरे फाटा चौक येथे उपलब्ध राहील.
चाकणकडे जाणे/येणे करीता एस.टी. हनुमानवाडी, इंद्रायणी हॉस्पीटल येथे थांबेल.
शिक्रापूर/शेलपिंपळगाव/नगरकडे जाणे/येणे करीता एस.टी. विश्रांतवड वडगाव रोड येथे उपलब्ध राहणार आहे.
