PCMC : ३६ वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बुधवारपासून बोपखेलमध्ये- अण्णा बनसोडे



पिंपरी चिंचवडला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद!

पिंपरी चिंचवड  : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने होणारी ३६वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ५ नोव्हेंबरपासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल गावठाण येथे सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. 

दरम्यान स्पर्धेचा समारोप २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्ता भरणे राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार असल्याचेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

सोमवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल बेनके, कार्याध्यक्ष दत्तात्रेय कळमकर, सहकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे, राजेंद्र ढमढेरे, खजिनदार प्रकाश पवार, राष्ट्रीय पंचप्रमुख गजानन मोकल, माजी नगरसेवक अविनाश काटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष शशिकांत घुले तसेच सतीश लांडगे, संजय अवसरमल आदी उपस्थित होते. दरम्यान स्पर्धेचे परीक्षण विविध जिल्ह्यातून येणारे ४० हून अधिक राष्ट्रीय पंच करणार आहेत.

स्पर्धेची माहिती देताना बाबुराव चांदेरे म्हणाले, यांना निवड चाचणी स्पर्धा बोपखेल येथील श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडा नगरी येथे पार पडणार आहे. यजमानपद पिंपरी चिंचवड शहराला प्राप्त झाले आहे. स्पर्धेचा शुभारंभ किशोर गटातील परभणी विरुद्ध बीड, पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड आणि रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व या सामन्यांनी होणार आहे. किशोरी गटात नाशिक शहर विरुद्ध ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड विरुद्ध नांदेड आणि परभणी विरुद्ध जळगाव हे सामने पहिल्या दिवशी रंगतील.

     विशेष म्हणजे गतवर्षी मनमाड येथे झालेल्या या स्पर्धेत किशोर गटात परभणीने आणि किशोरी गटात नाशिक शहरने विजेतेपद पटकावले होते. पिंपरी चिंचवड संघाला दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा स्पर्धा शहरातच होत असल्याने पिंपरी चिंचवड संघाला घरच्या मैदानाचा लाभ घेता येतो का याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

............................

अशी असेल स्पर्धेची गटवारी : किशोर गटात एकूण आठ गटांची विभागणी करण्यात आली आहे. 'अ' गटात परभणी, जळगाव आणि बीड, "ब" गटात पिंपरी चिंचवड, पुणे शहर, रायगड आणि सोलापूर, "क" गटात रत्नागिरी, नांदेड, मुंबई उपनगर पूर्व आणि सिंधुदुर्ग, "ड" गटात जालना, पालघर, नाशिक शहर आणि हिंगोली या संघांचा समावेश आहे. "इ" गटात ठाणे ग्रामीण, उस्मानाबाद, नाशिक ग्रामीण आणि सातारा, "फ" गटात कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे आणि मुंबई शहर पूर्व, "ग" गटात मुंबई उपनगर पश्चिम, अहमदनगर, लातूर आणि ठाणे शहर तर "ह" गटात नंदुरबार, सांगली, मुंबई शहर पश्चिम आणि पुणे ग्रामीण संघ स्पर्धेत उतरतील.

............................

किशोरी गटात "अ" गटात नाशिक शहर, मुंबई उपनगर पश्चिम आणि ठाणे ग्रामीण, "ब" गटात पिंपरी-चिंचवड, नंदुरबार, नांदेड आणि बीड, "क" गटात परभणी, रत्नागिरी, जळगाव आणि सोलापूर, "ड" गटात सांगली, ठाणे शहर, सातारा आणि औरंगाबाद, "इ" गटात पुणे ग्रामीण, अहमदनगर, पालघर आणि धुळे, "फ" गटात नाशिक ग्रामीण, कोल्हापूर, लातूर आणि हिंगोली, "ग" गटात जालना, पुणे शहर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग तर "ह" गटात मुंबई उपनगर पूर्व, रायगड, मुंबई शहर पश्चिम आणि मुंबई शहर पूर्व संघ सहभागी झाले आहेत.

.............

प्रतिक्रिया

 “कबड्डीचा धुरळा उडवण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे,” 

राज्यभरातून प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळवून देणारी ही किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगतदार होणार असून कबड्डी प्रेमींसाठी रोमांचक लढतींचा आनंद घेण्याची पर्वणी ठरणार आहे.

बाबुराव चांदेरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन

............................

कबड्डी हा आपल्या परंपरेचा खेळ आहे. आजच्या डिजिटल युगात अशा स्पर्धांमुळे तरुण वर्ग पुन्हा मैदानावर येतो, हे आनंददायी आहे,”पिंपरी चिंचवडला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, स्थानिक खेळाडूंना यातून प्रोत्साहन मिळते.

अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र राज्य. 

......................................

थोडे नवीन जरा जुने