पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खरा लोकनेता, कामगार-कष्टकरी-वाहतूकदार-ऑटो-टॅक्सी चालकांचा आधारवड, आमचा अजितदादा पवार यांचे अचानक, विमान दुर्घटनेत निधन झाले आहे. हा दिवस आमच्यासाठी, विशेषतः असंघटित क्षेत्रातील लाखो कष्टकऱ्यांसाठी, अंधकारमय झाला आहे.
अजितदादा हे फक्त राजकीय नेते नव्हते; ते आमच्या गोरगरिबांच्या, रस्त्यावर राबणाऱ्या ऑटो-टॅक्सी चालकांच्या, कामगारांच्या, वाहतूकदारांच्या खऱ्या साथीदार होते. त्यांच्या मनात नेहमीच सर्वसामान्य माणसाची काळजी होती. उपमुख्यमंत्री पदावर असतानाही ते एका कार्यक्रमात स्वतःची खुर्ची सोडून म्हणाले होते, "ये बाबा, माझ्या खुर्चीवर बस!" अशी आपुलकी, अशी मानवता, अशी सर्वसामान्यांना न्याय देण्याची वृत्ती आज आपल्यातून कायमची हरपली आहे.
त्यांच्या प्रशासनातील जरब, विकासकामांचा वेग, राज्याच्या प्रगतीचा स्पष्ट नकाशा त्यांच्या नजरेसमोर नेहमीच होता. महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला त्यांच्या जाण्याने एक मोठी खीळ बसली आहे. तीन लाख महाराष्ट्रातील असंघटित कष्टकरी आणि देशातील ४५ कोटी असंघटित कामगार-कष्टकरी जनतेच्या वतीने आम्ही आज एक खरा आधार गमावला आहे. दादांनी आमच्या संघटनेला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक दिली. आमचे प्रश्न ऐकून घेतले, समजून घेतले आणि सोडवण्यासाठी आयुष्यभर झटले.
आज दादांचा दीपस्तंभ अचानक विझला आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आमची चळवळ पोरखी झाली आहे, आमचा लोकनेता हरपला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने एक खरा सेवक गमावला आहे.
अजितदादा पवार यांच्या आत्म्याला चिरशांतता लाभो. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना, कार्यकर्त्यांना या अपरिहार्य दुःखात धीर धरण्याची शक्ती मिळो. आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या विचारांना, त्यांच्या लोकसेवेच्या मार्गाला पुढे नेऊ.
भावपूर्ण श्रद्धांजली..
डॉ. बाबा कांबळे
(ऑटो-टॅक्सी कामगार संघटना व असंघटित कष्टकरी जनतेच्या वतीने)
