आजचा काळ वेगाने बदलणारा आहे. तंत्रज्ञान, स्पर्धा आणि जागतिकीकरणामुळे केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिले नाही, तर स्वतःमध्ये उपयुक्त कौशल्ये विकसित करणे ही काळाची खरी गरज बनली आहे. आजच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य शिक्षण (Skill Education) अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
आज अनेक तरुण उच्च शिक्षित असूनही बेरोजगार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपली सध्याची शिक्षण व्यवस्था आणि उद्योगक्षेत्राच्या गरजांमधील वाढती दरी. आजही आपल्या शिक्षण पद्धतीत केवळ पाठांतर, परीक्षाभिमुख अभ्यास आणि मार्क्स यांनाच अधिक महत्त्व दिले जाते, तर प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणाऱ्या कौशल्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
आजच्या शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख त्रुटी
आजच्या शिक्षण व्यवस्थेत काही गंभीर कमतरता दिसून येतात:
पुस्तकी ज्ञानावर अतीभर, पण प्रॅक्टिकल नॉलेजचा अभाव
इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि इंडस्ट्री एक्स्पोजर कमी
विद्यार्थ्यांच्या आवडी व क्षमतेनुसार मार्गदर्शनाचा अभाव
करिअर काउन्सेलिंगची कमतरता
संवादकौशल्य, नेतृत्व, टीमवर्क यांसारख्या लाईफ स्किल्सकडे दुर्लक्ष
शिक्षण अभ्यासक्रम (Curriculum) अनेक वेळा जुनाट व उद्योगांच्या गरजांशी विसंगत
याचा परिणाम असा होतो की विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतो, पण नोकरीसाठी तयार नसतो. उद्योगांना "डिग्रीधारक" नव्हे, तर कौशल्यसंपन्न मनुष्यबळ हवे असते.
आजच्या इंडस्ट्रीजना टेक्निकल स्किल्स, डिजिटल लिटरसी, डेटा अॅनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्युनिकेशन स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन यांची मोठी गरज आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था ही इंडस्ट्रीच्या गरजांनुसार बदलली पाहिजे.
कॉलेज, आयटीआय, पॉलिटेक्निक, विद्यापीठे आणि प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमात
प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग, इंटर्नशिप, फील्डवर्क, स्टार्टअप कल्चर आणि स्किल ट्रेनिंग यांना प्राधान्य दिले पाहिजे.
कौशल्य शिक्षणामुळे तरुणांना आत्मविश्वास मिळतो, स्वावलंबनाची भावना निर्माण होते आणि रोजगाराच्या संधी वाढतात. आज डिजिटल मार्केटिंग, मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कोडिंग, शेतीपूरक उद्योग अशा विविध क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
पालक, शिक्षक आणि समाजानेही हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक मुलाने डॉक्टर, इंजिनिअर किंवा अधिकारीच व्हावे असा हट्ट न करता, प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कौशल्य विकसित करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
आज खरी गरज आहे ती डिग्रीपेक्षा स्किल्सना महत्त्व देण्याची, शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करण्याची आणि इंडस्ट्रीच्या गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करण्याची.
कौशल्य असलेला तरुण कधीही बेरोजगार राहत नाही.
म्हणूनच मी आवाहन करतो की, आजची पिढी केवळ शिक्षित नव्हे, तर कौशल्यसंपन्न, आत्मनिर्भर आणि रोजगारक्षम बनली पाहिजे.
– किशोर थोरात
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ
