Pune : तीन दिवस घोरावडेश्वर डोंगरावर वणवा; हजारो झाडे भस्मसात

 


वनसंपदा नष्ट, जैवविविधतेला धोका; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) - घोरावडेश्वर डोंगर परिसरात सलग तीन दिवस धुमसलेल्या भीषण वणव्यामुळे हजारो झाडे जळून खाक झाली असून वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणाला मोठा फटका बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार मानवी निष्काळजीपणा किंवा जाणीवपूर्वक हस्तक्षेपामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील ‘हिरवे फुफ्फुस’ म्हणून ओळखला जाणारा घोरावडेश्वर डोंगर या आगीत मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाला आहे. देशी वृक्षप्रजाती, गवताळ क्षेत्रे, झुडपे तसेच अनेक वन्यजीवांचा अधिवास आगीत नष्ट झाला. वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले, तरी झालेली पर्यावरणीय हानी भरून न निघणारी असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.

जैवविविधतेला गंभीर धोका

या वणव्यामुळे हरिण, ससा, मोर, सरपटणारे प्राणी आणि विविध पक्षी प्रजातींच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक लहान प्राणी आगीत सापडून मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय मातीची धूप वाढणे, जलसंधारण क्षमतेत घट होणे आणि भविष्यातील वृक्षलागवडीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. आहे.

मानवी निष्काळजीपणावर बोट

स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमी संस्थांच्या मते, डोंगर परिसरात जाणीवपूर्वक आग लावणे, कचरा जाळणे किंवा पर्यटकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात वणव्याच्या घटना घडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

‘हरित घोरावडेश्वर’ प्रकल्पावर पाणी

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून ‘हरित घोरावडेश्वर’ हा हरितीकरण आणि वनसंवर्धन प्रकल्प सातत्याने राबविण्यात येत आहे. हजारो देशी वृक्षांची लागवड, त्यांचे संगोपन, पाणीपुरवठा, संरक्षक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी अनेक कार्यकर्ते सातत्याने कार्यरत आहेत. मात्र या वणव्यामुळे या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

निसर्ग मित्र विभागाचे कार्यकर्ते विजय सातपुते म्हणाले,

“हरित घोरावडेश्वर प्रकल्पांतर्गत वर्षानुवर्षे आम्ही झाडे लावून त्यांचे संगोपन केले. काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे हजारो झाडे आणि वन्यजीवांचा संसार उद्ध्वस्त झाला, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. केवळ वृक्षलागवड नव्हे, तर वणवा रोखण्यासाठी कठोर नियम, व्यापक जनजागृती आणि दोषींवर तात्काळ कारवाई आवश्यक आहे.”


कठोर कारवाईची मागणी

पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी वणव्याला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच डोंगर परिसरात नियमित गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वयंसेवक पथके, जनजागृती मोहिमा आणि अत्याधुनिक वणवा-प्रतिबंधक प्रणाली तातडीने उभारण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाने तातडीने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात अशीच पर्यावरणीय हानी वारंवार होण्याचा धोका कायम राहील, असा इशाराही पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.


थोडे नवीन जरा जुने