कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव; ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथ देशात प्रथम


मुंबई (वर्षा चव्हाण) : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या चित्ररथाने देशात प्रथम क्रमांक पटकावत राज्याचा मान उंचावला. या उल्लेखनीय यशाबद्दलचे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा सन्मान मुख्यमंत्री यांना प्रदान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या चित्ररथात महाराष्ट्राच्या अष्टविनायक परंपरेचे आकर्षक दर्शन घडवण्यात आले. गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभाग, भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. पारंपरिक देखावे, वाद्यांच्या नादात साकारलेले सांस्कृतिक सादरीकरण आणि कलात्मक मांडणी यामुळे हा चित्ररथ विशेष ठरला.

यासोबतच गणेशोत्सवामुळे मूर्तीकाम, सजावट, रोषणाई, वाद्यनिर्मिती आणि संबंधित उद्योगांमध्ये लाखो हातांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींचे प्रभावी चित्रण करण्यात आले. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळकटी देणारा आणि स्थानिक कारागीर, कलाकार व उद्योजकांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा संदेश या चित्ररथातून देण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन करताना सांगितले की, “महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि लोकसहभागाची ताकद देशासमोर प्रभावीपणे मांडण्यात आमचा चित्ररथ यशस्वी ठरला आहे. हा सन्मान राज्यातील कलाकार, कारागीर आणि नागरिकांचा आहे.”

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

थोडे नवीन जरा जुने