निघोजे–चिखली जलप्रकल्पातून दूषित पाणीपुरवठा; मोशी परिसरात नागरिकांचा आक्रोश

 


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी प्राधिकरण परिसरात गेल्या एका महिन्यापासून पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून निघोजे पाणी उपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून येणारे पाणी अत्यंत अशुद्ध व आरोग्यास घातक असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः सेक्टर ४, ६, ९ आणि ११ या संपूर्ण परिसरात पाण्याची गुणवत्ता अत्यंत खालावली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मागील एक महिन्यापासून नळाला येणाऱ्या पाण्याला उग्र दुर्गंधीयुक्त वास येत आहे. अनेक ठिकाणी पाणी पिवळसर तर काही ठिकाणी हिरवट रंगाचे दिसत आहे. या बदललेल्या पाण्यामुळे ते वापरणे तर दूरच, पिणेही धोकादायक ठरत असल्याचे नागरिक सांगतात. सूर्यकिरण सोसायटी, साहिल रेसिडेन्सी, ओलर्क रेसिडेन्सी, साई पार्क, साहिल सिद्धी, श्री कृष्णा सोसायटी आदी अनेक ठिकाणी पाण्याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, या तक्रारींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

दूषित पाण्यामुळे परिसरात नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक नागरिकांना पोटदुखी, जुलाब, उलट्या, मळमळ यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. काही प्रकरणांमध्ये नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचेही समोर आले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक त्रास होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

काही जागरूक नागरिकांनी स्वतः पाण्याची तपासणी केली असता TDS (Total Dissolved Solids) चे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. यामुळे पाणी “हार्ड वॉटर” बनले असून त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. तसेच pH पातळी कमी असल्याने पाणी आम्लीय असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाण्यामध्ये अळ्या सदृश घटक आढळत आहेत. याशिवाय पाण्यात पिवळसर रंग दिसत असल्याने लोखंडी गंज किंवा इतर धातूंचे अंश मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 ज्या भागांमध्ये पवना नदी व निगडी प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो, त्या भागांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी नसल्याने निघोजे–चिखली प्रकल्पातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


 परिसरातील नागरिकांनी पुढील मागण्या केल्या आहेत –

निघोजे पाणी उपसा केंद्रातील पाण्याची तातडीने सखोल तपासणी करावी

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया त्वरित सुधारावी

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ पर्यायी स्वच्छ पाणीपुरवठा करावा. शक्य असल्यास पुन्हा पवना नदीतून पाणीपुरवठा सुरू करावा.

पिंपरी चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात अशा प्रकारचा दूषित पाणीपुरवठा होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना केल्या नाहीत, तर ही समस्या आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने त्वरीत ठोस पावले उचलणे अत्यावश्यक बनले आहे.

थोडे नवीन जरा जुने