श्रवणदोष दिव्यांग बालकांना श्रवणयंत्रांचा आधार

 


जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व विपला फाऊंडेशनमार्फशिबिर

पिंपरी चिंचवड: लवकर उपचार व लवकर निदान उपचारादरम्यान शून्य ते सहा वर्ष वयोगटातील श्रवणदोष असलेल्या दिव्यांग बालकांना सक्षम आयुष्य जगण्यासाठी पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व विपला फाऊंडेशनमार्फत मोफत श्रवणयंत्र वितरण शिबिराअंतर्गत औंध येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आवारातील पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पंधरा श्रवणबाधित बालकांना प्रत्येकी दोन असे तीस मोफत श्रवणयंत्र वितरण करण्यात आले 

औंध जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास ताठे, समाजसेवा अधीक्षक विनोद सहाय,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प समन्वयक भाग्यश्री मोरे,जिल्हा समन्वयक यशवंत सोळंके,समुपदेशक हरिदास शिंदे, अभिराज फाऊंडेशनचे संचालक रमेश मुसुडगे, सक्षम संस्थेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भेगडे,विपला संस्थेच्या ध्वनी सेंटरच्या ऑडिओलॉजिस्ट प्रियांका दांडेकर , सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम पार पडला.

विपला फाउंडेशन सेव्ह द चिल्ड्रन इंडिया, व महात्मा गांधी सेवा संघ संचलित पुनर्वसन केंद्राच्या विद्यमाने तसेच एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने १ एप्रिल २०२५ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आजपर्यंत नोंदणीकृत तीनशे पेक्षा जास्त श्रवणबाधित दिव्यांग बालकांना नामांकित कंपनीचे दर्जेदार श्रवणयंत्रे मोफत वाटप करण्यात आले आहेत.आगामी काळात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक भाग्यश्री मोरे यांनी यावेळी बोलताना दिली.

-------

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकाचे आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र, पालकाचे आधार कार्ड आणि ऑडिओग्राम अहवाल आवश्यक. तसेच सात वर्षांवरील 'यूडीआयडी' धारक श्रवणबाधित दिव्यांगांसाठी सुद्धा पूर्वनोंदणीच्या माध्यमातून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे,अशी माहिती प्रकल्प संचालक विजय कन्हेकर यांनी दिली आहे.

थोडे नवीन जरा जुने