!-- afp header code starts here --> पिंपळे गुरवमध्ये पाण्याअभावी झाडे जळाली; उद्यान विभाग सुस्त, अधिकारी मस्त

पिंपळे गुरवमध्ये पाण्याअभावी झाडे जळाली; उद्यान विभाग सुस्त, अधिकारी मस्त

 


पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव येथील रामनगर परिसरातून सीएमई सैन्य दलाच्या सीमेला लागून जाणाऱ्या रस्त्यावर, ब्लू डार्ट ते मयूर नगरी चौक या दरम्यानच्या फूटपाथवरील अनेक झाडे पाण्याअभावी जळून गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. साधारण ५ ते १५ फूट उंचीपर्यंत वाढलेली सुमारे २५ झाडे पूर्णपणे वाळून गेली आहेत.

महापालिकेने शहरात ३२ लाख झाडे असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात वाढलेली झाडे जपण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना, झाडांचे असे होणारे नुकसान ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

फूटपाथ विकसित करताना झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आवरण देण्यात आले आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांना आवश्यक जागा व पाणी मिळत नाही. परिणामी झाडे कोरडी पडून जळत आहेत. “झाडे लावा, झाडे जगवा” हा शासनाचा संदेश फक्त घोषणांपुरताच राहिला आहे का, असा सवाल मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी उपस्थित केला आहे.

“आजचे वृक्षारोपण आणि संरक्षण म्हणजे उद्याच्या पिढीच्या ऑक्सिजनची हमी आहे. मात्र ही जबाबदारी केवळ बोलण्यातच मर्यादित राहिली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

झाडांची अवस्था पाहून महाराष्ट्र शासनाचे वृक्षमित्र अरुण पवार यांनी टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. “गरज भासल्यास संपर्क साधा, आम्ही तत्काळ टँकर उपलब्ध करून देऊ,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उद्यान विभागातील अधिकारी “माहिती घेतो, कारवाई करतो” असे सांगून वेळ काढत असल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड यांनी केला आहे. तसेच अशा कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या निवेदनावर शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा संजना करंजावणे, उपाध्यक्ष काळुराम लांडगे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सचिव गजानन गजानन, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद मांगले, जालिंदर दाते, संजय कांबळे, गणेश वाडेकर, पंडित वनस्कर, रितेश वनस्कर, महेश राऊत आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने वाळलेल्या झाडांचे छायाचित्र संकलन करून अधीक्षक महेश गारगोटे यांना निवेदन देण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने