शहरातील सर्व रिक्षा स्टँड 'आदर्श समाजसेवा केंद्र' बनावेत - डॉ. बाबा कांबळे



भोसरी येथील यशवंतनगरमध्ये 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड'चे भव्य उद्घाटन

पिंपरी-चिंचवड: "पिंपरी-चिंचवड हे कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांचे शहर आहे. या शहराच्या दळणवळणामध्ये रिक्षा हे अत्यंत महत्त्वाचे साधन असून नागरिकांना केवळ प्रवास सेवा न देता, रिक्षा स्टँड हे 'समाजसेवा केंद्र' म्हणून नावारूपास यायला हवेत. प्रत्येक रिक्षा चालकाने सौजन्यपूर्ण सेवा देऊन आपले स्टँड आदर्श निर्माण करावेत," असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केले.


भोसरी येथील यशवंतनगर चौकात, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड'चे उद्घाटन डॉ. बाबा कांबळे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी ते उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन करत होते.

संघटनेच्या २० वर्षांच्या लढ्याला यश

यावेळी बोलताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, "२००६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र रिक्षा पंचायतीला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन दशकांत आपण रिक्षा चालकांच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक लढे दिले. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून घेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तसेच, 'मुक्त रिक्षा परवाना' धोरणामुळे रिक्षांची संख्या अफाट वाढून चालकांच्या पोटावर पाय येत होता. ही बाब लक्षात घेऊन आपण दिलेला लढा यशस्वी झाला असून, महाराष्ट्रात आता मुक्त रिक्षा परवाना बंद झाला आहे, ही रिक्षा चालकांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे."

महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना म्हणून उदय

आज महाराष्ट्र रिक्षा पंचायत ही केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना बनली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बीडसह राज्यातील ८ जिल्ह्यांत संघटनेची हक्काची कार्यालये असून सर्व ३६ जिल्ह्यांत पदाधिकारी सक्रिय आहेत. केवळ रिक्षा चालकांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडल्यामुळेच संघटनेचा हा विस्तार झाला असल्याचे त्यांनी नमूद केले

उपस्थित मान्यवर आणि संयोजन

या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायत विभागाध्यक्ष गणेश लोखंडे, महाराष्ट्र वाहतूक पंचायत उपाध्यक्ष नदीम शेख, स्टँड अध्यक्ष अंकुश भाऊ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टँडचे उपाध्यक्ष शाम वाघमारे, खजिनदार लखन मस्के, सचिव विशाल लगाडे, तसेच कार्यकारी सदस्य विशाल वाघमारे, विकी सोनकांबळे, आशपाक शेख, संभाजी शेंडगे, मनोज शिंदे, अविनाश गवळी, ऋषिकेश कांबळे, आतिश बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने