PCMC
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ( पीएमपी, एसटी व लोकल रेल्वे) सध्या फार वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे ही गुव्यवस्था वापरणार् या नागरिकांना ( प्रामुख्याने मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक) फार त्रास iहोतोय. ही व्यवस्था बिनभरोश्याची झाल्यामुळे लोक नाईलाजाने कर्ज काढून खाजगी वाहने घेत आहेत. दरवर्षी खाजगी वाहनांच्या संख्येत २ लाखांची भर पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला एसटी व पीएमपीच्या बस संख्येत दुप्पट वाढ अपेक्षित असताना त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सध्या जेवढ्या बसेस मोडीत काढल्या जातात, त्यापेक्षा कमी नवीन बसेस विकत घेतल्या जातात.
त्यामुळे आज खाजगी वाहनांच्या प्रचंड संख्येने सर्वाना सर्वत्र वाहतूक कोंडी ला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण वाढत आहे.
राज्य सरकारच्या धोरणामुळे एसटीची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. गाड्या बंद पडणे, वेळेवर न येणे, फेर्या रद्द होणे यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे . दररोज ५५ लाख प्रवाशांना वाहून नेणारी एसटी आज वाढत्या प्रवासी संख्येला अपुरी पडत आहे. प्रवासी वाढत असताना बसेसची संख्या मात्र १८ हजारावरून १५ हजारावर आली आहे. नुकतीच सरकारने ५ हजार नवीन बसेस घेण्याची घोषणा केली आहे. परंतु त्याचवेळी जुन्या ताफ्यातील ५ हजार बसेस मोडीत काढल्या जाणार आहेत. म्हणजे एकूण एकच होणार आहे.
पीएमपी कडे सध्या दोन हजारच्या आसपास बसेस आहेत. पुणे महानगर क्षेत्राची लोकसंख्या बघता ४ हजार बसेस ची गरज आहे. परंतु नवीन बस खरेदी वारंवार पुढे ढकलली जात आहे.
पुणे ते लोणावळा या मार्गावर रेल्वेच्या २ लाइन्स च्या ऐवजी ४ लाईन्स करण्याच्या गोष्टी गेली २० वर्षे चालू आहेत. या कामाला फक्त ७ हजार कोटी रुपयांची गरज असताना ते सोडून २५ हजार कोटी रुपयांची पिंपरी ते स्वारगेट मेट्रो उभारण्यात आली. आता त्यानंतर त्यात सतत नवीन मार्गांची भर पडत आहे. दररोज ७ लाख प्रवाशांची क्षमता असताना २ लाखावर हा आकडा जात नाही. जुने उड्डाण पूल पाडून मेट्रो उभारण्याचा अट्टाहास लोकप्रतिनिधी आणि सरकार करीत आहेत.
अशा पद्धतीने खाजगी वाहनांचे उत्पादक, मेट्रो उभारण्यासाठी आणि चालविण्यासाठी लागणार्या कंपन्या यांचे हितसंबंध जपण्यात सरकार दंग असल्याने सर्व सामान्यांच्या बस व रेल्वे कडे पहायची त्यांची इच्छा नाही. एसटी व पीएमपी यांचे खाजगीकरण करायचे डोक्यात असल्यमुळे ही व्यवस्था जास्तीत जास्त मोडकळीस आणण्याचे कारस्थान सरकार रचित आहे.
या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी सर्व संघटनांची एक कृती समिती स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी 'जवाब दो आंदोलन - पिंपरी चिंचवड ' कार्यकर्त्यांची एक मीटिंग २० सप्टेंबर रोजी आयोजित करीत आहे. या बैठकीत पुढील कार्याची दिशा ठरवण्यात येईल? तरी या बैठकीस आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
आपले
डॉ सुरेश बेरी सुरेश बावनकर सचिन देसाई सुधीर मुरुडकर राम नलावडे गोकुळ बंगाळ अड. ह्रषीकेश भोसले
स्थळ - डॉ बेरी बिल्डिंग, आकुर्डी, पार्किंग मध्ये
वेळ - रविवार, दि. २० सप्टेंबर, २०२६,सकाळी ११ वा.
