बारामती (प्रतिनिधी - वर्षा चव्हाण) : बारामती पोस्टल विभागांतर्गत येणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विभागीय स्तरावर ४ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता “पोस्टल पेन्शन अदालत” आयोजित करण्यात आली आहे.
या अदालतमध्ये निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध तक्रारींवर सुनावणी होणार आहे. टपाल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारींचाही विचार केला जाणार आहे. विशेषतः तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर कार्यवाही केली जाणार आहे.
मात्र, उत्तराधिकार किंवा धोरणात्मक (नितिगत) स्वरूपाच्या तक्रारींवर या अदालतमध्ये सुनावणी होणार नाही. तसेच, यापूर्वीच्या पेन्शन अदालतमध्ये ज्यांची दखल घेतली गेली आहे, अशा तक्रारी पुन्हा स्वीकारल्या जाणार नाहीत. ज्या तक्रारींची पूर्वी दखल घेतली गेलेली नाही, त्यांचाच समावेश केला जाईल. प्रत्येक तक्रारदाराने एकच तक्रार लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक निवृत्तीवेतनधारकांनी विहीत नमुन्यातील अर्ज अधीक्षक डाकघर, बारामती विभाग, बारामती मुख्य टपाल कार्यालय, बारामती (पिन – ४१३१०२) येथे ३० एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती अधीक्षक डाकघर केतन शित्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
