MGID Header Code
Code End

श्री क्षेत्र हटकेश्वर देवस्थानच्या पर्यटन विकासाला चालना; ८० लाखांचा निधी मंजूर


जुन्नर (आनंद कांबळे) : जुन्नर तालुक्यातील मौजे गोद्रे येथील श्री क्षेत्र हटकेश्वर देवस्थानाच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली असून यासाठी सुमारे ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती आनंदा मांडवे यांनी दिली.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०२५–२६ अंतर्गत हटकेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या पायवाटांचा विकास करण्यासाठी ७९.७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीमुळे देवस्थान परिसरातील मूलभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे.

या संदर्भात २ मार्च २०२६ रोजी आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते काळुदादा शेळकंदे व ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांच्या माध्यमातून आमदार शरददादा सोनवणे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी आमदार सोनवणे यांनी या वर्षातच हटकेश्वर देवस्थानाचा विकास करून वनपर्यटनाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला होता.

यानंतर आमदारांच्या सूचनेनुसार वनविभागातील खाडे साहेब व चव्हाण साहेब यांनी विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे हटकेश्वर देवस्थानाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून भविष्यात हे ठिकाण भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रसंगी आनंदा मांडवे, लोकनियुक्त सरपंच सौ. अनिता कैलास रेंगडे तसेच कैलास रेंगडे उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने