सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाकडून महापौर रवी लांडगे यांना निवेदन

 


पिंपरी-चिंचवड : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राविभाऊ लांडगे यांना चिखली घरकुल परिसरातील महानगरपालिका दवाखान्यातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांबाबत तसेच दूषित पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत सविस्तर निवेदन दि. ४ एप्रिल रोजी त्यांच्या निवासस्थानी सादर करण्यात आले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिखली घरकुल येथील महानगरपालिका दवाखाना सध्या मर्यादित वेळेत सुरू असून रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध होत नाहीत. दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असून अनेक महत्त्वाचे विभाग कार्यरत नाहीत. तसेच एक्स-रे, लॅब तपासणी, आपत्कालीन सेवा, ॲम्बुलन्स आदी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय, परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून पाण्याच्या गुणवत्तेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या दोन्ही समस्या अत्यंत गंभीर असल्याने महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.

या प्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर आण्णासाहेब थोरात, पुणे जनरल सेक्रेटरी रवींद्र भाऊसाहेब आळणे, सदस्य आबासाहेब आहेर, गुलचंद लोखंडे तसेच मगदुम साहेब उपस्थित होते.

महापौर राविभाऊ लांडगे यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत लवकरच संबंधित विभागांना निर्देश देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, नागरिकांच्या आरोग्य व मूलभूत हक्कांशी संबंधित या समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास भविष्यात संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

थोडे नवीन जरा जुने