पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गाजत असलेल्या ५२ कोटींच्या, जो आकडा आता ६० कोटींच्या घरात पोहोचला आहे, त्या 'बोगस उपसूचना' घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष यशवंत कांबळे यांनी केली आहे. केवळ कागदोपत्री फेरफार करून जनतेच्या कराचा कोट्यवधी रुपयांचा निधी ठेकेदारांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घोटाळ्याचे गांभीर्य मांडताना यशवंत कांबळे यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:
स्थायी समितीची मंजुरी नाही: ज्या कामांसाठी निधी वळवण्यात आला, त्यास स्थायी समितीची कोणतीही अधिकृत प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही.
बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर: अधिकृत कागदपत्रांमध्ये फेरफार करून आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून उपसूचना तयार केल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
प्रशासकीय साखळीवर संशय: लेखा विभागाने नियमबाह्य उपसूचनांच्या आधारे देयके (Payments) अदा करण्यासाठी दाखवलेली तत्परता संशयास्पद असून, यामागे मोठी प्रशासकीय साखळी असण्याची शक्यता आहे.
यशवंत कांबळे (उपाध्यक्ष, AAP पिंपरी-चिंचवड) यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "जर केवळ कागदावरच्या घोळामुळे कोट्यवधी रुपये ठेकेदारांच्या खिशात जात असतील, तर प्रशासन नक्की काय करत आहे? डोळे मिटून हा भ्रष्टाचार सुरू आहे का? पिंपरी-चिंचवडच्या जनतेचा पैसा अशा प्रकारे लुटला जात असेल, तर आम आदमी पार्टी ते खपवून घेणार नाही."
आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या:
१. या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी.
२. बनावट स्वाक्षऱ्या करणाऱ्या आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
३. या प्रकरणातील दोषी कितीही मोठा असला, तरी त्याला पाठीशी न घालता कठोर शासन व्हावे.
भ्रष्टाचाराला थारा देणाऱ्या या प्रवृत्तींविरुद्ध 'आप' रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
