!-- afp header code starts here --> PCMC: पाणी प्रश्नावर नगरसेवक आक्रमक, पण बिल्डरांच्या हमीपत्रावर मौन!

PCMC: पाणी प्रश्नावर नगरसेवक आक्रमक, पण बिल्डरांच्या हमीपत्रावर मौन!


- महापालिका सर्वसाधारण सभेतील चर्चेत मुख्य मुद्याकडेच दुर्लक्ष 

- सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी व्यक्त केली नाराजी

पिंपरी-चिंचवड : शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाणीपुरवठ्याच्या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या काल पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या ज्वलंत विषयावर अपेक्षित चर्चा न होता, सभेचे लक्ष इतर वादांकडे वळल्याचे दिसून आले.

शहरातील अनेक सोसायट्या सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) मिळवताना भामा-आसखेड पाणी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याचे हमीपत्र दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या अटींचे उल्लंघन होत असून रहिवाशांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

सभेत या मुद्द्यावर ठोस चर्चा होऊन प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, तसेच नियमभंग करणाऱ्या बिल्डर्सवर कारवाईची दिशा ठरावी, अशी अपेक्षा होती. परंतु कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाने या विषयावर एक शब्दही उच्चारला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, सभेत दोन ज्येष्ठ नगरसेविकांमध्ये SRA (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) विषयावर जोरदार वादावादी झाली. या वादामुळे सभेचे लक्ष मूळ नागरी समस्यांवरून भरकटल्याची टीका होत आहे. पाणीपुरवठा हा शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर सभेत चर्चा झाली असती, तर प्रशासनाला ठोस निर्णय घेण्याची दिशा मिळाली असती आणि नागरिकांनाही दिलासा मिळाला असता.

सोसायटीधारकांचा संताप ... 

पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “गेल्या दहा वर्षांपासून आम्ही या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहोत. बिल्डर्सनी दिलेल्या हमीपत्राचा भंग हा स्पष्टपणे कायद्याचा भंग आहे. सभेत या मुद्द्यावर चर्चा होऊन सोसायटीधारकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या गंभीर विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.” या पार्श्वभूमीवर, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया : 

“गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सोसायटीधारकांच्या पाणीप्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहोत. बिल्डर्सनी भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण होईपर्यंत स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याचे लेखी हमीपत्र दिले होते; मात्र त्याचा सर्रास भंग होत आहे, हा स्पष्टपणे कायद्याचा अवमान आहे. कालच्या सर्वसाधारण सभेत या गंभीर विषयावर चर्चा होऊन ठोस निर्णय अपेक्षित होता, परंतु एकाही नगरसेवकाने यावर शब्द काढला नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जोपर्यंत सोसायटीधारकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील.”

- संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन.

थोडे नवीन जरा जुने