मुंबई (वर्षा चव्हाण) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.
दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्था आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत व्हावी, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे.
राज्याच्या परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

