पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाच्या जून महिन्यात वाढदिवस असलेल्या १६ सन्माननीय सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यान, पेठ क्रमांक १८, महात्मा फुले नगर, चिंचवड येथे पिंपळ वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
संत तुकाराम महाराजांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या विचारातून प्रेरणा घेत संघाच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात पिंपळ वृक्षाची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ वृक्षारोपण न करता या वृक्षांच्या वर्षभर संगोपन व संरक्षणाची जबाबदारीही संघाने स्वीकारली आहे.
यावेळी संघाचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, "वृक्ष लावणे ही काळाची गरज असून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वाढदिवसासारखे आनंदाचे क्षण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे."
भारतीय संस्कृतीत पिंपळ वृक्षाला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असून भगवान बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाल्याची मान्यता आहे. तसेच हा वृक्ष पर्यावरण संवर्धन, वायुप्रदूषण नियंत्रण, भूजल संवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठीही अत्यंत उपयुक्त मानला जातो.
आजच्या काळात वाढदिवस मोठ्या खर्चाने किंवा पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या पद्धतीने साजरे करण्याऐवजी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. "एक व्यक्ती – एक वृक्ष" हा संदेश देत प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष यशवंत कन्हेरे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
