!-- afp header code starts here --> रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी


ब्लॅक स्पॉटची संयुक्त पाहणी करून २९ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुणे (वर्षा चव्हाण) : पुणे जिल्ह्यातील रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) संयुक्त पाहणी करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तातडीने सुचवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. याबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक  परिवहन अधिकारी संदेश चव्हाण,  पुण्याचे सहायक उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे राहूल जाधव, बारामतीचे सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील रस्ते अपघात रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे ब्लॅक स्पॉटची पाहणी करून अपघातांची कारणे आणि आवश्यक उपाययोजनांचा अहवाल २९ जून २०२६ पर्यंत सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

अपघात प्रतिबंधासाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देताना त्यांनी संबंधित विभागांना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही दिला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नवले ब्रिज परिसरातील वारंवार होणारे अपघात कमी करण्यासाठी यापूर्वी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने करावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांजवळ जनजागृतीसाठी मोठे फलक उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच ग्रामीण पोलीस दलाकडून अपघातप्रवण स्थळांची यादी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी आणि अपघातांचे एक प्रमुख कारण म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन असल्याचे नमूद करत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असल्याचे आवाहनही गिल यांनी केले.

बैठकीत परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रस्ते अपघात रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली.

थोडे नवीन जरा जुने