पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभाग व महिला विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वटपौर्णिमा उत्सव सोमवारी (दि. २९ जून) संत कबीर बाग, सेक्टर क्र. २४, प्राधिकरण, निगडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन, भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदाचा जागर घडवून आणणाऱ्या विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या हस्ते वडाच्या वृक्षाचे वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिक गायत्री मंत्र पठणाच्या साक्षीने नव्याने लावलेल्या वडाच्या वृक्षाचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
याच कार्यक्रमात आयुर्वेद अभ्यासक डॉ. अजित जगताप लिखित ‘कालगणनेतील आयुर्वेद रहस्य’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या प्रा. शैलजा सांगळे यांच्या शुभहस्ते महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुस्तकाचे मुखपृष्ठ उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरले.
मार्गदर्शन करताना डॉ. अजित जगताप यांनी भारतीय कालगणना, ऋतुचक्र, तिथी, वार, नक्षत्र आणि आयुर्वेद यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. आपल्या ऋषीमुनींनी निसर्ग आणि मानवी आरोग्याचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक जीवनपद्धती विकसित केली असून, त्या परंपरेचे जतन व आचरण करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्या प्रा. शैलजा सांगळे यांनी कुटुंबातूनच सुसंस्कारित समाजाची निर्मिती होते, असे सांगत पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि भारतीय संस्कृतीतील मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, निसर्ग मित्र विभाग, महिला विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


