!-- afp header code starts here --> आळंदीत वारकऱ्यांच्या समस्या आणि धर्मशाळेच्या दुरुस्तीबाबतच्या प्रयत्नांना यश; डॉ. बाबा कांबळे यांचे सत्याग्रह आंदोलन मागे

आळंदीत वारकऱ्यांच्या समस्या आणि धर्मशाळेच्या दुरुस्तीबाबतच्या प्रयत्नांना यश; डॉ. बाबा कांबळे यांचे सत्याग्रह आंदोलन मागे


पिंपरी-चिंचवड/आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, आळंदी येथील वारकऱ्यांच्या समस्या, दलित व मागासवर्गीय दिंड्यांची गैरसोय आणि धर्मशाळेच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी ८ जुलै रोजी सत्याग्रह आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासकीय पाहणी आणि आश्वासनांनंतरचा निर्णय

डॉ. बाबा कांबळे यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी या विषयाची तातडीने दखल घेत सकारात्मक पुढाकार घेतला. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आळंदी पोलीस प्रशासन आणि आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे यांनी प्रत्यक्ष धर्मशाळेची पाहणी केली असून, पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी वारकऱ्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

वारकऱ्यांच्या हितासाठी सरकार व प्रशासनासोबत’ - डॉ. बाबा कांबळे

आंदोलन मागे घेण्याची घोषणा करताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, "सध्या निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि वारकऱ्यांसमोर असलेले प्रश्न पाहता, प्रशासनाला अधिक अडचणीत आणणे योग्य नाही. वारकऱ्यांची सेवा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य असून, प्रशासनाला सहकार्य करून सेवा करण्याचा निर्णय आम्ही आळंदी येथील वारकऱ्यांच्या सभेत घेतला आहे."

समाजकंटकांपासून सावध राहण्याचे आवाहन

डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले की, "संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. वारकऱ्यांच्या रास्त प्रश्नांचा आधार घेऊन काही समाजकंटक आणि विघातक प्रवृत्ती या पवित्र सोहळ्यात शिरकाव करून हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. अशा शक्तींना संधी मिळू नये, यासाठी आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे."

भ्रष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढा सुरूच

"आमचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. मात्र, गेल्या ३०-४० वर्षांपासून संस्थेच्या नावावर स्वार्थ साधणाऱ्या, देवाची मालमत्ता हडपणाऱ्या आणि दिंडी परंपरेत जातीय भेदभावाचे विष पेरणाऱ्या भ्रष्ट विश्वस्तांविरुद्ध आमचा कायदेशीर लढा सुरूच राहील," असेही डॉ. बाबा कांबळे यांनी ठामपणे नमूद केले.

वारकऱ्यांचा सन्मान, दलित दिंड्यांवरील अन्याय दूर करणे आणि धर्मशाळेचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आमदार महेशदादा लांडगे, नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे आणि आळंदी प्रशासन यांचे या यशस्वी समन्वयाबद्दल डॉ. बाबा कांबळे यांनी आभार मानले आहेत.


संपर्क:

डॉ. बाबा कांबळे,

राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन कष्टकरी जनता आघाडी

अध्यक्ष, समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान, श्री क्षेत्र आळंदी देवाची.

मोबाईल: ९८५०७३२४२४

थोडे नवीन जरा जुने