सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला कष्टकरी संघर्ष महासंघाचा पाठिंबा
पिंपरी-चिंचवड - दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी सोनम वांगचूक यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला आज १८ दिवस पुर्ण होत आहे, मात्र निगरगट्ट सरकारकडून आंदोलकाशी बोलले जात नाही, चर्चा केली जात नाही असे अनेकदा घडत आहे सरकारच्या या अक्षम्य चुका आहेत असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड येथे कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सोनम वांगचूक यांना पाठिंबा दिला. यावेळी महासंघाचे संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, राजेश माने, मंजू सिंग, सविता सावंत, सविता वरत, शिल्पा शिंदे, नंदा सांगोली, संगीत वसे, मीरा सोनकांबळे, नीलम सरवदे, सुनील कोरे, अनिल यादव आदीसह कामगार उपस्थित होते.
काशिनाथ नखाते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी अत्यंत गंभीर असून याचा लाखो तरुणांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलनाचा सन्मान राखणे आणि जनतेच्या भावना समजून घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा.
पुढे नखाते म्हणाले की, NEET परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी करत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशीही मगणी नखाते यांनी केली आहे.
