मुंबई (वर्षा चव्हाण) : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयातील राज्य नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आला आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : 1070 (टोल-फ्री)
नियंत्रण कक्ष : +91-9321587143
ई-मेल : controlroom@maharashtra.gov.in
तसेच, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती प्रशासनाला देण्यासाठी विशेष ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती नोंदणी लिंक :
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
नेपाळमध्ये महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
माहिती भरताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास नमूद करावा. या माहितीच्या आधारे प्रशासनाला अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत व बचावकार्य करण्यास सुलभता होणार आहे.
नेपाळमधील पूरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता तातडीने राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, तसेच उपलब्ध माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
