MGID Header Code
Code End

मार्क झुकेरबर्ग यांच्या मेटाच्या निमित्ताने !

 

ही धूर्त कॉर्पोरेट भांडवलशाही आपल्या पितरांचे जेऊन आली आहे.

_____________

ऑगस्ट २६ २०२६ रोजी अमेरिकेतील कोर्टाने META / मेटाचे फेसबुक, इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्म लहान मुलांवर त्या कोवळ्या वयात दुष्परिणाम करतात असा निर्णय देत मेटा कंपनीला दंड ठोठावला. मेटा कंपनीने त्यांच्या प्रॉडक्ट्स आणि अल्गो मध्ये बदल करण्याचे देखील मान्य केले. 

मेनस्ट्रीम आणि सोशल मीडियावर अनेकांनी त्या निर्णयाचे स्वागत केले. मी देखील स्वागताची पोस्ट लिहिली होती. 

कारण सोशल मीडियाचा लहान वयाच्या  / शाळेतील मुलांवर गंभीर विपरीत परिणाम होत आहे हे आता सिद्ध झाले आहे. त्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांचे जाबदयित्व पिन डाऊन करण्याची गरज होती. आहे. त्या अर्थाने चांगला निर्णय होता तो. 

आपल्याला वाटेल की कोर्टाने दोषी ठरवल्यामुळे, दंड ठोठावल्यामुळे मेटाचे प्रवर्तक / व्यवस्थापन दुःखी असेल ; असे वाटत असेल तर आपण प्राथमिक शाळेतील निरागस मुले आहोत हे नक्की 

____________________________

आता त्या बातमीचे अधिक विश्लेषण पुढे येत आहे. त्यानुसार मेटा कंपनीवर या शिक्षेचा नक्की काय परिणाम झाला आणि कंपनी त्या निर्णयाला कसा प्रतिसाद देते हे बघण्यासारखे आहे (संदर्भ Scott Galloway)

दंड किती होता: १८ बिलियन डॉलर्स. ही रक्कम पुढच्या दहा वर्षात द्यायची. म्हणजे वर्षाला अंदाजे १.८ बिलियन डॉलर्स १८०० मिलियन डॉलर्स. 

मेटा कंपनीचे वार्षिक उत्पन्न २०० बिलियन डॉलर्स आणि नफा अंदाजे ४० टक्के, म्हणजे ८० बिलियन डॉलर्स. त्या तुलनेत दरवर्षी द्यायला लागणारे १.८ बिलियन डॉलर्स म्हणजे नफ्याच्या दोन टक्के. आणि उत्पन्न आणि नफा भविष्यात वाढत जाईल त्याप्रमाणात ही टक्केवारी कमी होत जाणार. 

मेटाने कोर्टाने सुनावलेले जाबदायित्व स्वीकारले पण त्याचा वापर करून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाहिरात देखील सुरू केली. आपले स्पर्धक असणाऱ्या यूट्यूब, टिकटॉक या प्लॅटफॉर्म पेक्षा मेटा / आपण लहान मुलांची कशी अधिक काळजी घेणार आहोत…वगैरे. 

यामुळे लहान मुलांची काळजी घेणारी नवीन प्रॉडक्ट्स, प्रणाली, अल्गो यामुळे मेटा प्लॅटफॉर्मचे ग्राहक वाढतील असे सांगितले जाते.

निकालाच्या दिवशी ऑगस्ट २६ रोजी मेटा कंपनीचा शेयर ५७६ डॉलर होता तो आता ६७३ डॉलर झाला आहे ; म्हणजे एका महिन्यात १८ टक्क्यांनी वधारला आहे 

निकालाच्या दिवशी मेटा कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन १४०० बिलियन होते ते वाढून आता १७०० बिलियन झाले आहे. त्या प्रमाणात प्रवर्तक / व्यवस्थापक श्रीमंत झाले आहेत. 

या सगळ्या आकडेवारीच्या तुलनेत मेटा कंपनीला जो दरवर्षी दंड भरावा लागणार आहे त्याची तुलना करून तुम्हीच पहा. ___________________________

हा अमेरिकेतील कॉपोरेट प्रणाली / रेग्युलेटर्स यांच्या पुरता मर्यादित मुद्दा नाही. भारताला देखील लागू आहे. 

आपल्या देशात रिझर्व्ह बँक / सेबी / कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय / रियल इस्टेट रेग्युलेटर उर्फ रेरा / प्रदूषण मंडळे ….आणि अर्थातच न्यायालये गुन्हा (! ) करणाऱ्या त्यांच्याकडे जाबदायी असणाऱ्या रेग्युलेटी एंटिटीना काही बाही दंड आकारत असतात …. सगळे काही इंटरनेट वर उपलब्ध आहे. 

तो तथाकथित गुन्हा करून त्या एंटीटीला झालेला लाभ आणि त्यांना आकारलेला दंड यांचा काही परस्पर संबंध असतो का ? ( मागच्या वर्षी अमेरिकेतील Gene Street बलाढ्य ब्रोकरेज कंपनीने भारतात कसा आणि किती नफा कमावला आणि त्या कंपनीला किती दंड झाला हे गुगल करा)

कॉर्पोरेट प्रणालीचा या अंगाने सतत अभ्यास होण्याची गरज आहे. नैतिक अहंगंडी अण्णा लोकांनी असा अराजकीय भ्रम तयार केला की तथाकथित स्वच्छ चारित्र्य असणारी माणसे आली की सर्व आबादी आबाद होईल. 

भ्रष्टाचार / सट्टेबाजी / खोके पेट्या या सगळ्या आरोपात तथ्य आहे हे कोण नाकारेल पण ही महाकाय , अत्यन्त गुंतागुंतीची , सर्वात धूर्त प्रणाली यांच्या पलीकडे अस्तित्वात आहे. राहील. हे अण्णा लोकांच्या आकलनाच्या पलीकडे आहे. ___________________

तरुण पिढीसाठी. 

आमची पिढी या प्रभावाखाली होती. तरुणांनी या ट्रॅप मध्ये अडकू नये. कॉर्पोरेट क्षेत्रापासून दूर जाऊ नका. ते क्षेत्र म्हणजे एक मदमस्त बैल आहे. तो मानव केंद्री अर्थव्यवस्थेच्या नांगरणीसाठी, त्याच्या नाकात वेसण घालून जोडला गेला पाहिजे. पण झालेय असे की तो मागे आणि त्यानेच माणसाला जुंपले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला वेसण घालून काम करून घेणे तुम्ही फक्त सत्तेचे राजकारण करूनच करू शकता. पण पुन्हा एकदा नैतिक अहंगंडी अप्रोच तुम्हाला सत्तेच्या राजकारणाबद्दल तुच्छता भाव बाळगायला भाग पाडतो. त्यामुळे खूप नुकसान झाले आहे. 

संजीव चांदोरकर (१८ सप्टेंबर २०२६)

थोडे नवीन जरा जुने