पूर्वांचल विद्यार्थ्यांचे ‘वंदे मातरम्’ समूहगायन; पथनाट्य व रांगोळी प्रदर्शन
पिंपरी-चिंचवड | वार्ताहर : शिवानंद चौगुले
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि संस्कार भारती पश्चिम प्रांत, पिंपरी-चिंचवड समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा ही संस्कृती’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आर्मी पब्लिक स्कूल, देहू रोड येथे इयत्ता अकरावीच्या १६ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून सेवा, सामाजिक जबाबदारी, स्वच्छता, एकता आणि संस्कारांचा संदेश दिला. प्रभावी अभिनय आणि संवादातून सादर करण्यात आलेल्या पथनाट्याची सांगता ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाली.
याच उपक्रमांतर्गत ‘वंदे मातरम् – पूर्वांचल छात्र’ या कार्यक्रमात पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे भावपूर्ण सामूहिक गायन केले. तसेच भारत माता भवन, बकावुल्फ कॉलनी, लिंक रोड, चिंचवड येथे ‘सेवा ही संस्कृती – रांगोळी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले. शीतल कांबळे, आशा गभाले, छाया गायकवाड, आसावरी बर्वे आणि अनिता रोकडे यांनी भारतीय संस्कृती, राष्ट्रभावना, स्वच्छता व सामाजिक एकात्मतेचे संदेश रांगोळीतून साकारले.
पथनाट्यात संजय चांदगुडे, लीना आढाव, मंदार फाकटकर, गणेश आढाव, आसावरी बर्वे व शोभा पवार सहभागी झाले. दिग्दर्शन नरेंद्र आमले यांनी केले.
यावेळी वैशाली आठल्ये, राजेंद्र काकडे, रोहिणी जोशी व सुनीता जुन्नरकर यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी आणि कलासाधक उपस्थित होते.
‘सेवा ही केवळ कृती नसून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य संस्कार आहे,’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
