MGID Header Code
Code End

ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवांचा ‘सोलापूर पॅटर्न’ पुण्यातही यशस्वी होणार

 

लोकसहभाग, संवाद, जनजागृतीने सामाजिक परिवर्तन शक्य : सिद्धाराम पाटील

पुणे  (शिवानंद चौगुले) — लोकसहभाग, सातत्यपूर्ण जनजागृती, सकारात्मक संवाद, माध्यमांचा प्रभावी वापर आणि कायद्याचे पालन या माध्यमातून मोठे सामाजिक परिवर्तन घडवून आणता येते. सोलापूरमध्ये राबविण्यात आलेली ‘डीजेमुक्त उत्सव’ चळवळ हे त्याचे प्रभावी उदाहरण असून, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम केल्यास ‘सोलापूर पॅटर्न’ पुण्यातही निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार तथा ‘डीजेमुक्त सोलापूर’ अभियानाचे मुख्य प्रवर्तक सिद्धाराम पाटील यांनी व्यक्त केला.

पुण्यातील ऐतिहासिक केसरी वाडा येथे जागरूक पुणेकर नागरिक समितीच्या वतीने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात सौरभ वीरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान पाटील बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, नगरसेवक कुणाल टिळक, तुळशीबाग मित्र मंडळाचे नितीन पंडित, ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र माळवदकर, शिरीष मोहिते, स्वरूपवर्धिनीचे अजय कदम, पांडुरंग बलकवडे, महेश पवळे तसेच विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सोलापूरमध्ये वर्षातील १८७ दिवस उत्सव

सिद्धाराम पाटील यांनी सोलापूरमधील डीजेमुक्तीच्या चळवळीचा प्रवास सांगताना स्पष्ट केले की, पोलिसांच्या नोंदीनुसार सोलापूर शहरात वर्षभरात सुमारे १८७ दिवस विविध सण-उत्सव साजरे होतात. शहरात कन्नड, तेलुगू तसेच विविध समाजघटक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांत उत्सवांमध्ये डीजेच्या वाढत्या आवाजामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

२०२५ मध्ये शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एका ८० वर्षीय महिलेची प्रकृती बिघडली. त्यांच्या मुलाने आवाज कमी करण्याची विनंती केली असता त्यांच्याशी धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत त्या महिलेच्या श्रवणक्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम झाल्याचे समोर आले. या घटनेने समाजमन हादरले आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ‘डीजेमुक्त उत्सव’ या अभियानाला सुरुवात झाली.

संवादातून निर्माण झाला विश्वास

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीपूर्वी विविध आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. कायदा सर्वांसाठी समान असावा, ही भूमिका बहुतांश पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली. सोलापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक अत्यंत मोठी असल्याने या विषयावर कोणताही गैरसमज किंवा सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली.

दरम्यान, १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकीत डीजेसमोर नाचताना एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ध्वनिप्रदूषणाविरोधातील जनजागृती अधिक व्यापक करण्यात आली.

डॉक्टर, वकील, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांना एकत्र आणून ‘डीजेमुक्त सोलापूर कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पुढाकारातून २४ संघटना या मोहिमेत सहभागी झाल्या. पहिल्याच बैठकीला १५२ मान्यवर उपस्थित होते. एका दिवसात तब्बल ४८ हजार नागरिकांनी डीजेविरोधात प्रतिज्ञापत्र भरून आपला सहभाग नोंदविला. सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून जनजागृती केली.

या व्यापक लोकसहभागामुळे डीजेमुक्तीची चळवळ हळूहळू लोकआंदोलनात रूपांतरित झाली.

 गणेश मंडळांचा डीजेमुक्तीचा निर्धार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सुमारे ५०० गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, एकाही मंडळाने डीजेची मागणी केली नाही. उलट सर्वांनी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हा बदल केवळ पोलिसांची कारवाई किंवा कायद्याच्या भीतीमुळे झाला नसून, सातत्यपूर्ण संवाद, जनजागृती आणि समाजातील विविध घटकांचा विश्वास संपादन केल्यामुळे झाला, असे पाटील यांनी सांगितले. डीजेचा आवाज कमी झाल्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा उत्सवातील सहभाग वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

कारवाईसोबत संवाद’ हाही महत्त्वाचा मंत्र

सोलापूर पोलिसांनी आवश्यक त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली; मात्र त्याचवेळी नागरिकांशी संवाद साधण्यावरही भर दिला. सुरुवातीच्या काळात कोणत्याही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. पुढे या अभियानाशी सुमारे तीन लाख नागरिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडले गेले आणि त्यानंतर राजकीय नेतेही या मोहिमेत सहभागी झाले.

‘समाजावर टीका करण्यापेक्षा समाजाच्या मनापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील मशिदींवरील सार्वजनिक भोंगे हटविण्याच्या प्रक्रियेतही प्रशासनाची इच्छाशक्ती, नागरिकांचा सहभाग, संवाद आणि जनजागृती महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले. नवरात्रोत्सवाच्या काळात ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदूंच्या सणाला डीजे कशासाठी?’ या विषयावर जनजागृती करण्यात आली होती.

उत्सवांचा उद्देश समाज जोडणे

सामाजिक परिवर्तनासाठी संवाद हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. लोकांवर केवळ बंधने लादण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगणे अधिक परिणामकारक ठरते. सण-उत्सव हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजाला एकत्र आणण्याचे, संस्कार देण्याचे आणि भारतीय सांस्कृतिक मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पुण्यातही व्यापक चळवळीची गरज

पुण्यात गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. त्यामुळे उत्सवाचा आनंद कायम ठेवत ध्वनिप्रदूषण टाळणे, न्यायालयीन व शासकीय नियमांचे पालन करणे आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. सोलापूरप्रमाणे पुण्यातही सर्व धर्म, समाजघटक, गणेश मंडळे, सामाजिक संस्था, प्रशासन, पोलिस, डॉक्टर, माध्यमे आणि नागरिक यांनी एकत्र येऊन काम केल्यास ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवाची संकल्पना निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

यावेळी सौरभ वीरकर यांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा व्हावा; मात्र त्याचा इतर नागरिकांना त्रास होऊ नये आणि अशिष्ट प्रकारांना आळा बसावा, अशी भूमिका मांडली. निलेश धायरकर यांनी न्यायालयीन व शासकीय नियमांचे पालन करून निर्धारित ध्वनीमर्यादा पाळण्याचे आवाहन केले.

महेश सूर्यवंशी यांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे कौतुक केले. नगरसेवक कुणाल टिळक यांनी पुणे शहरासाठी सर्व धर्म, सर्व सण आणि सर्व प्रकारच्या मिरवणुकांना लागू होईल, असे स्पष्ट व सर्वसमावेशक ध्वनी व्यवस्थापन धोरण तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. वसुंधरा काशीकर यांनी समारोप करताना जागरूक पुणेकर नागरिक समितीच्या ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव चळवळीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सुमित डोळे यांनी केले.

स्पीकरमुक्त उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा गौरव

कार्यक्रमात आदर्श बाल मंडळ, समता प्रतिष्ठान आणि किंग्स बॉईज ग्रुप यांना स्पीकरमुक्त उत्सव साजरा केल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनात पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट, लोकशाही जागर मंच, राष्ट्र प्रथम फाउंडेशन, सुराज्य सर्वांगीण प्रकल्प आणि समता प्रतिष्ठान यांनी सहभाग घेतला.

वार्ताहर : शिवानंद चौगुले

महाराष्ट्र जनभूमी न्यूज

थोडे नवीन जरा जुने