आकुर्डी-चिखली रोडवरील प्रकार; सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनचालक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची गैरसोय
चिंचवड वार्ताहर : शिवानंद चौगुले : आकुर्डी-चिखली रोडवरील कृष्णानगर येथील मुख्य चौकामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने वाहतूक नियंत्रण शाखेचा सिग्नलचा खांब आडवा झाल्याने शुक्रवारी सकाळी चौकातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. सिग्नल बंद असल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे कर्मचारी तसेच वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याने संबंधित यंत्रणेला घटनेची माहिती मिळाली असण्याची शक्यता आहे. मात्र, सकाळची वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने वाहतूक पोलिसांची नियुक्ती किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गणेश मंडळाच्या मिरवणुकीतील वाहनाचा धक्का लागल्याने सिग्नलचा खांब आडवा झाल्याचे समजते. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यामुळे अशी घटना घडली असल्यास त्याची नोंद, सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास आणि संबंधित वाहनाचा शोध घेण्याची कार्यवाही तातडीने होणे अपेक्षित आहे.
सिग्नल यंत्रणा बंद पडणे ही केवळ तांत्रिक समस्या नसून गर्दीच्या चौकात त्याचा थेट परिणाम वाहतूक सुरक्षेवर होतो. त्यामुळे अशा प्रसंगी संबंधित विभागाने परिस्थितीची पाहणी करून तात्पुरती वाहतूक व्यवस्था करणे आणि सिग्नलची दुरुस्ती तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. नागरिकांना प्रशासनाकडून केवळ कारवाईची नव्हे, तर घटना घडताच तत्पर प्रतिसादाची अपेक्षा आहे.
कृष्णानगर चौकातील ही परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी कर्मचारी नियुक्त करून वाहतूक सुरळीत करावी, आडवा झालेला सिग्नलचा खांब हटवून यंत्रणा पूर्ववत करावी आणि घटनेला जबाबदार वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र जनभूमी न्यूज
वार्ताहर : शिवानंद चौगुले
