मुख्य रस्त्यावर जनावरांचा वाढता वावर; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
निगडी | वार्ताहर : शिवानंद चौगुले
निगडी परिसरातील साईनाथनगर येथील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यातून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने मोकाट जनावरे एकाच ठिकाणी जमा होत असून, याच परिसरात मलमूत्र विसर्जन होत असल्याने सकाळपर्यंत रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात घाण साचलेली दिसून येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
साईनाथनगर हा नागरिकांची सतत वर्दळ असलेला परिसर आहे. सकाळच्या वेळेस नागरिक मॉर्निंग वॉकसाठी, विद्यार्थी शाळा-महाविद्यालयासाठी तर कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी या मुख्य रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर, त्यांचे मलमूत्र आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि सकाळी नियमित फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मलमूत्रामुळे निर्माण होणारी घाण, त्यावर घोंघावणाऱ्या माशा तसेच परिसरातील दुर्गंधी यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर रस्त्यावर मोकाट जनावरे अचानक आडवी येत असल्याने वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताची शक्यताही निर्माण होते.
कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
महापालिकेच्या संबंधित विभागाने केवळ अधूनमधून स्वच्छता करण्याऐवजी या समस्येच्या मुळाशी जाऊन मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करणे, मोकाट जनावरांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेणे, परिसराची नियमित स्वच्छता करणे तसेच ज्या ठिकाणी जनावरे रात्री जमा होतात त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छतेच्या बाबतीत अग्रस्थानी ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असताना, शहरातील अनेक भागांच्या अंतर्गत रस्त्यांवर आणि कानाकोपऱ्यात मोकाट जनावरे, कचरा, मलमूत्र आणि दुर्गंधीचे प्रश्न अद्याप कायम असणे ही चिंतेची बाब आहे. शहराच्या प्रमुख भागांबरोबरच उपनगर आणि अंतर्गत परिसरातील स्वच्छतेकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
साईनाथनगरमधील या समस्येची महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी आणि नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दुर्गंधीमुक्त परिसर मिळण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी स्थानिक नागरिकांची प्रमुख मागणी आहे.
— महाराष्ट्र जनभूमी न्यूज
वार्ताहर : शिवानंद चौगुले
