आत्मसन्मान, एकजूट आणि सामाजिक सहभागाचा दिला संदेश
पुणे : बुधवार पेठेतील महिलांनी प्रथमच ढोल-ताशा, झांज आणि ध्वजाच्या माध्यमातून गणपती बाप्पाला मानवंदना देत आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि एकजुटीचा संदेश दिला.
मंथन फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी होण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील आत्मविश्वासाला बळ मिळावे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बाजू समाजासमोर यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मंथन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आशा भट्ट म्हणाल्या, “प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा आणि समाजात आत्मविश्वासाने सहभागी होण्याचा अधिकार आहे. या महिलांमध्ये असलेली क्षमता, जिद्द आणि एकजूट समाजासमोर यावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. ढोल-ताशांच्या माध्यमातून त्यांनी केवळ गणरायाला मानवंदना दिली नाही, तर आपल्या आत्मविश्वासाची आणि एकजुटीचीही अभिव्यक्ती केली.”
‘महिलांच्या सन्मानासाठी एक पाऊल, आत्मसन्मानासाठी एक पाऊल’ या भावनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. महिलांनी स्वतः पुढाकार घेत सराव करून या सांस्कृतिक उपक्रमाची तयारी केली.
या उपक्रमासाठी प्रकल्प समन्वयक प्राजक्ता भगाडे, मेरी डिसोझा, मीनाक्षी खोब्रागडे आणि रमा सर्व महिला यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजन आणि सहकार्यामुळे महिलांचा सहभाग उत्साहपूर्ण आणि अर्थपूर्ण ठरला.
ढोल-ताशांचा निनाद, झांजांचा गजर आणि हातातील ध्वज यामधून महिलांनी “आमची एकजूट, आमचा आत्मविश्वास आणि आमचा आत्मसन्मान” हा संदेश दिला.
गणपती बाप्पा मोरया!
