MGID Header Code
Code End

गिनीज विश्वविक्रमात चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे नाव !

 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ४,११२ ढोलांच्या गजरात मानवंदना ; संजीवन सांगळे यांचा सहभागाबद्दल गौरवोद्गार

पिंपरी चिंचवड : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देत पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एकाचवेळी ४,११२ ढोलवादकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वादन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणारा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या ऐतिहासिक उपक्रमाच्या अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्रावर चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लिमिटेडचे नाव नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे चिखली-मोशी परिसरातील सोसायटीधारकांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये हा भव्य विश्वविक्रमी सोहळा पार पडला. हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात मोशी, स्पाईन रोड आणि वाघेश्वर मंदिर, चऱ्होली या तीन ठिकाणी एकाचवेळी ढोल-ताशांचे वादन करण्यात आले. हजारो वादकांनी एकसंध ठेका, शिस्त आणि समन्वय साधत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अनोखी मानवंदना अर्पण केली.

२ हजार ६५०चा विक्रम मोडीत

विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी वादकांना तीन संधी देण्यात आल्या. सलग पाच मिनिटे सर्वाधिक ढोलांचे शिस्तबद्ध आणि एकाचवेळी वादन करणे हे या विक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. यापूर्वी २ हजार ६५० ढोलवादकांच्या वादनाचा विक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४,११२ ढोलवादकांनी सहभाग घेत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद, शंखनाद आणि शिव-शंभूंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला. ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

१११ शंखांचा सामूहिक निनाद

या सोहळ्यात १११ शंखांचा सामूहिक शंखनाद हे विशेष आकर्षण ठरले. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’सोबत उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या धर्मध्वजालाही यावेळी मानवंदना देण्यात आली. ‘शिवशंभो गर्जना’, मर्दानी खेळ, शाहिरी सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा जागर करण्यात आला.

सामाजिक बांधिलकीचा संदेश

विश्वविक्रमाच्या या उपक्रमासोबतच ‘गोमाता सन्मान अभियान’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. भारतमातेची आकर्षक रंगावली तसेच संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायनही करण्यात आले.

फेडरेशनचे नाव गिनीज प्रमाणपत्रावर

चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने या ऐतिहासिक उपक्रमात सहभाग नोंदविल्याने फेडरेशनच्या कार्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ठसाही अधोरेखित झाला. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनच्या माध्यमातून शहरातील सोसायटीधारकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम केले जात आहे. आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत प्रमाणपत्रावर फेडरेशनचे नाव नोंदविले गेल्याने चिखली-मोशी परिसरासाठी ही विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.

प्रतिक्रिया - 

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पिंपरी-चिंचवडचे नाव नोंदविले जाणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या ऐतिहासिक उपक्रमात चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे नाव गिनीजच्या अधिकृत प्रमाणपत्रावर नोंदविले जाणे ही विशेष आनंदाची बाब आहे.”

“हजारो वादकांची शिस्त, स्वयंसेवकांचे नियोजन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा विक्रम साकार झाला. हा विश्वविक्रम केवळ ढोलवादनाचा नसून आपल्या सांस्कृतिक एकतेचा आणि सामूहिक सहभागाचा गौरव आहे,”

- संजीवन सांगळे,अध्यक्ष, चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने