Badlapur Local Accident: धावत्या लोकलमध्ये चढताना नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू (video)

 


कल्याण : असुरक्षित प्रवास पुन्हा एकदा जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना बदलापूर रेल्वे स्थानकात घडली आहे. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका 28 वर्षीय महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. चेतना चंद्रशेखर देवरुखकर असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना 31 जानेवारी 2026 रोजी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजून 10 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणारी जलद लोकल बदलापूर स्थानकातून सुटत असताना ही घटना घडली. लोकल सुटण्याचा भोंगा वाजल्यानंतरही चेतना यांनी धावत येत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो क्षण त्यांच्यासाठी शेवटचा ठरला.

चेतना देवरुखकर या बदलापूरमधील जुवेली परिसरातील जगन्नाथ गॅलेक्सी येथे वास्तव्यास होत्या. त्यांचा विवाह अवघ्या वर्षभरापूर्वीच झाला होता. अचानक घडलेल्या या अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून त्यात अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते. फुटेजनुसार, प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानाने धावती ट्रेन पकडू नये, असे प्रवाशांना हाताने इशारे देत सांगितले होते. मात्र चेतना यांनी त्याकडे दुर्लक्ष करत चालू ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला.

ही घटना पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या धोक्याची जाणीव करून देणारी असून प्रवाशांनी सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.

थोडे नवीन जरा जुने